संक्षिप्त सद्गुरू चरित्रअध्याय १२४२:१९मलरहित तूं अससि गुरुदेवा । काय तो वानावा महिमा बोलों ॥ १ ॥सेवकां रक्षिसि करोनी कल्याण । त्यांचें जन्म-मरण निवारोनी ॥ २ ॥वायूसम तूंचि सकळां जीवविसी । भक्तांतें रक्षिसि सर्वकाळ ॥ ३ ॥वेदशास्त्ररूपी वृक्षाचें तूं फळ । सामर्थ्य अतुल तुझें ठायीं ॥ ४ ॥उपनिषदांनीं वर्णिंल्या आत्म्याची । प्राप्ती करूनी साची देसी तूं कीं ॥ ५ ॥पूर्ण परात्परू तूंचि सद्गुरुनाथ । कैवार तूं घेत सद्गक्तांचा ॥ ६ ॥विषयवासना नसे जयांपाशीं । त्यांच्या कैवारासी धांव घेसी ॥ ७ ॥कराल तो काळ तुझाचि अंकित । परिपूर्ण नित्य अससी तूं ॥ ८ ॥उपाधिरहित स्वानंदसागरू । तुझा अंत-पारू न लगे कवणा ॥ ९ ॥स्वयंप्रकाशी तूं जगतासी आधार । तुझा जयजयकार करीतसे ॥ १० ॥अत्यंत तूं शुद्ध स्वयं तूंचि ज्ञान । मदनासी नाशोनि टाकितोसी ॥ ११ ॥दयेचा सागर तूं गा परात्परा । तुझा जयजयकार असो सदा ॥ १२ ॥माझा तो मीपणा नाशानियां तुम्ही । स्तवनाची ऊर्मी दिधली मज ॥ १३ ॥तूं गा त्रिगुणातीत तूंचि मायबाप । त्रिविधही ताप निवारिसी ॥ १४ ॥अंतर्बाह्य जो कीं व्यापोनी राहतो । आत्मा अससी तो तूं कीं माझा ॥ १५ ॥कांहीं न बोलणें हेंचि तुझें स्तवन । पूजा हेचि जाण न करणें कांहीं ॥ १६ ॥जीव-शिव अथवा ब्रह्माव दुरी । सांडोनी निर्धारीं राहणें तें ॥ १७ ॥ऐसें असे जरी तरी मी लेंकरूं । म्हणोनि स्वीकारूं करीं माझा ॥ १८ ॥वेडावलें बाळ बोले नाना रीती । तैसा तुम्हांप्रती स्तवितों मी ॥ १९ ॥सकळिकाची मज क्षमा ती करोनि । घ्यावें सामावोन स्वरूपमाजीं ॥ २० ॥ऐसा तूं समर्थ म्हणूनी जयजयकार । करितों साचार क्षणोक्षणीं ॥ २१ ॥ऐसे जे सद्गुरु बाबा रामचंद्र । रावसाहेब थोर म्हणती ज्यांसी ॥ २२ ॥वासुदेवानंत सरस्वती हैं नाम । अवधूत पूर्णकाम देती त्यांसी ॥ २३ ॥योगपट्टमाजी हेंचि नाम त्यांचें । लिहिलेले साचें असे जाणा ॥ २४ ॥पूर्ण योगारूढ होवोन बैसले । हें नाम त्या वेळे ठेविती दत्त ॥ २५ ॥स्वयं सद्गुरू बाबा आपुलिये हस्तें । नांव लिहिती तें फोटोखालीं ॥ २६ ॥तो फोटो दिधला जोगळेकर यांसी । रामभाऊ शिष्यासी सद्गुरूंनीं ॥ २७ ॥जोड पादुकांची जोडी दिली एक । गाणगापुरीं देख तयांसी ती ॥ २८ ॥पुरंदरे कॉलनीत असे ज्यांचें घर । रक्षिती ते फार फोटोसी त्या ॥ २९ ॥तयां मंत्रदीक्षा देती सद्गुरुराज । जावयासी माज अहेंतेचा ॥ ३० ॥एकदां तयांचा मुलगा अमांशानें । आजारीपणानें गृहीं होता ॥ ३१ ॥रामभाऊ आले बाबांचे दर्शना । सांगती बाबांना पुत्रवार्ता ॥ ३२ ॥बाबांनीं आणविलीं केळीं डझनभर । भक्षिलीं समग्र तेच क्षणीं ॥ ३३ ॥बाबा अमांशानें जाती परसाकडे । इकडे वाटे बरें रामभाऊसुता ॥ ३४ ॥रामभाऊ काढिती भूतपिशाच्चासी । साह्य ते लोकांसी करिती ऐसें ॥ ३५ ॥मिसर नांवाचे शिष्य एक होते । परि निवर्तले ते पुण्यांतची ॥ ३६ ॥त्यांचे नांवापुढें बाबांनीं लिहिलें । शिवाजी हैं भलें एक नांव ॥ ३७ ॥आर्. बी. आंबेकर शिष्य हे बाबांचे । रहिवासी पुण्याचे असती आज ॥ ३८ ॥रामचंद्र नाम म्हणती भाऊ यांसी । हे दत्त भक्तीसी करितात ॥ ३९ ॥यांसी गणपति एक बाबांनीं दिधला । गृहांत ठेविला असे यांनीं ॥ ४० ॥एक तो पोपट पिंजऱ्यासहित । बाबा यांसी देत पाळावया ॥ ४१ ॥इस्लामपुरीं चालवील दत्त-संप्रदाय । ऐसी उक्ती होय बाबांची ती ॥ ४२ ॥पी.डब्ल्यू.डी. त होते नोकरीस । पाणी-खातीं त्यास दिधली सेवा ॥ ४३ ॥सतत दश वरुषें यांनीं सेवा केली । बाबांची सकाळीं देऊनी चहा ॥ ४४ ॥न चुकतां येती चहा द्यावयास । कोणी तरी खास प्रतिदिनीं ॥ ४५ ॥उदबत्ती लावोनि गृहीं बैसतात । प्रश्न सांगतात लोकांसी हे ॥ ४६ ॥यशवंत अप्पा यांचा एकचि हा सुत । नोकरी करित पुण्यामाजी ॥ ४७ ॥तोही बाबांकडे जात सर्वकाळ । तया सद्गुरु दयाळ सांभाळिती ॥ ४८ ॥बी. डी. कुळकर्णी असती शिष्य एक । नोकरी सुरेख करोनियां ॥ ४९ ॥त्यांसी मंत्रानुग्रह दिधलासे बाबांनीं । गणेश अथर्वशीर्ष सांगोनी सुखी केलें ॥ ५० ॥कुळकर्णी जाती बाबांकडे नित्य । साधाया स्वहित आपुलें तें ॥ ५१ ॥गणोरे ते भक्त स्वपत्नीसहित । बाबांकडे जात दर्शनासी ॥ ५२ ॥शंकर टिकारे होता एक भक्त । बाबांच्या तो येत दर्शनासी ॥ ५३ ॥पावला पंचत्व गेला तो मरोन । येती कोण कोण ऐसें जाणा ॥ ५४ ॥रामभाऊ सहस्रबुद्धे दर्शनासी जाती । सेवा ते करिती बाबांची कीं ॥ ५५ ॥आपुले गृहांत वसती पुण्यांत । आजारी ते असत सर्वकाळ ॥ ५६ ॥मोडक टेलर्स यांचे चालक मोडक । दर्शनासी एक येत होते ॥ ५७ ॥हेजीब दुकानंदार दर्शनासी येती । श्रद्धा त्यांची होती बाबांवरी ॥ ५८ ॥जी. पी. जोशी एक येत दर्शनास । पी.डब्ल्यू.डी. खात्यास नोकरी करिती ॥ ५९ ॥पाटील नांवाचे एक इंजिनीअर । भाविक जे फार येती तेथ ॥ ६० ॥दर्शन बाबांचें करोनियां जाती । असे दृढ भक्ती त्यांची थोर ॥ ६१ ॥तया आशीर्वाद असे तो बाबांचा । भाव थोर त्यांचा बाबांवरी ॥ ६२ ॥महाडदोळकर भक्त राहती बुधवारान्त । दर्शनासी येत रावसाहेबांचे ॥ ६३ ॥अद्यापही येती समाधीचे स्थानीं । दर्शना लागोनी महाडदोळकर ॥ ६४ ॥त्यांचे पुत्र तेही पुढें चालविती । वडिलांची ही भक्ती भावनें ॥ ६५ ॥अजोनिही बाबा देवोनि दर्शन । करिती समाधान तयांचे कीं ॥ ६६ ॥इंजिनीअर गोडबोले बाबांचे खोलींत । दर्शनासी येत वारंवार ॥ ६७ ॥खंडेराव वाघ भक्त ते बनोन । राहताती अजून पुण्यामाजी ॥ ६८ ॥त्यांनींच एक प्लॉट दिधला बक्षीस । करुनी कागदास रजिस्टर ॥ ६९ ॥अप्पा आठवले पुण्याचे डॉक्टर । जाती वारंवार दर्शनासी ॥ ७० ॥एक रत्तल कॉडलिव्हर यांसी तें पाजिलें । एका वेळीं गेले पिओनि हे ॥ ७१ ॥यांचे ते वडील असती भाऊराव । दर्शना स्वयमेव येती जाती ॥ ७२ ॥दत्तोपंत भट नोकरी करीत । रेशनिंग खात्यांत होते तेव्हां ॥ ७३ ॥येती बाबांपाशीं सेवा करण्यासी । करिती वंदनासी भावें हे कीं ॥ ७४ ॥श्रीसूक्ताचे पाठ करण्या सांगितले । बाबांनी त्या वेळे यांसी सदा ॥ ७५ ॥किराणा दुकान नारायण पेठेंत । कांहीं दिवस असत यांचें तें गा ॥ ७६ ॥बाबांचे हे भक्त असती श्रद्धायुक्त । परी विपरीत वर्तताती ॥ ७७ ॥मकरंद भट असती वकील पुण्यांत । बालाजी मंदिराप्रत वाडा यांचा ॥ ७८ ॥यांचे लग्नासमयीं बाबा हजर होते । नातेवाईक ते बाबांचे कीं ॥ ७९ ॥भापकर पिता-पुत्र येती दर्शनास । पेट्रोल पंपास चालविती ॥ ८० ॥रंगराज बछराज मेहता मारवाडी । श्रद्धा यांची बडी सद्गुरुचरणीं ॥ ८१ ॥नित्य सोमवारीं दर्शनासी जाती । बाबा पुशितात वृत्तांत सारें ॥ ८२ ॥बाबांचे कृपेनें यांसी पुत्र दोन । दिलीप विजय म्हणोन झाले तेव्हां ॥ ८३ ॥भाविक मारवाडी असे निष्ठावंत । भक्ती जो करीत श्रद्धेनें कीं ॥ ८४ ॥रंगराज आणि त्यांचे पुत्र दोन । मंदिरीं येवोन दर्शन घेती ॥ ८५ ॥दर सोमवारीं बाबांचे मंदिरीं । न चुकतां यांची स्वारी येत असे ॥ ८६ ॥बाबांचे कृपेनें असती आनंदांत । आनंदें रहात पुण्यामाजी ॥ ८७ ॥घसेटी पुलावरी बेंद्रे एक भक्त । दर्शनासी जात बाबांकडे ॥ ८८ ॥त्यांच्या मालकीचें घर असे तेथ । समाधी असत तेथे एक ॥ ८९ ॥नाथ-संप्रदायी समाधी ती एक । वरी नंदी देख बसलेला ॥ ९० ॥याचे गृहीं बाबा गेले एक वेळ । पाहोनी सकळ आले स्थान ॥ ९१ ॥तयासी सांगती मीच असे नंदी । बोलुनी कृपानिधी स्वयमेव ॥ ९२ ॥नंदीवरी गळती ठेवा सांगितलें । अभिषेका भले करा तेथ ॥ ९३ ॥यांचेवरी कृपा असे ती बाबांची । बेंद्रे ज्योतिबाची करिती भक्ती ॥ ९४ ॥ठाकुर बॉन्डरायटर काम लिहिण्याचें । करिती हे साचें बुधवात्रांत ॥ ९५ ॥सिटी पोस्टासमोर बैसोनी लिहितीत । मनीऑर्डरी पत्रें नित्य लोकांची ते ॥ ९६ ॥अद्यापी हे येती समाधी-मंदिरीं । निष्ठा यांची खरी बाबांवरती ॥ ९७ ॥वसंतराव पेठे भक्त ते बाबांचे । येउनी समाधीचें दर्शन घेती ॥ ९८ ॥बाबांनीं दिलेले यांसी कांहीं पैसे । त्यांची पूजा तैसे करिती नित्य ॥ ९९ ॥मुकुंद आणिक रमेश तो पेठे । भक्त हेही मोठे मुलगे दोन्ही ॥ १०० ॥पेठ्यांची मंडळी आणिक ती कन्या । येती दर्शन घेण्या समाधीस ॥ १०१ ॥शंकर कुळकर्णी सिनेमांत नट । त्याची होत भेट बाबांपाशीं ॥ १०२ ॥भक्ती करितसे बाबांची तो तेव्हां । दावी प्रेमभावा बाबांठायीं ॥ १०३ ॥प्रभाकर जोशी असे जो ज्योतिषी । तोही बाबांपाशीं नित्य येई ॥ १०४ ॥करूनियां जाई बाबांचें दर्शन । मंत्र त्या देवोन तोषवीला ॥ १०५ ॥माधव दत्तात्रेय चितळे पुण्यास । करोनियां वास राहातसे ॥ १०६ ॥त्यासी मंत्रानुग्रह दिधला बाबांनी । उपासना करोनी वर्तत आहे ॥ १०७ ॥त्याचे चुलते होते थोर ते कीं फार । परि कवणा थार देती न ते ॥ १०८ ॥अपुले अनुसंधान कळाया न देती । नित्य ते राहती गृहीं यांच्या ॥ १०९ ॥दिघे मास्तर यांसी म्हणती ते बाबा । अँड्र्यूज सेंट तूं गा पूर्वजन्मीं ॥ ११० ॥त्याचेवरी कृपा करूनी बाबांनी । लावियेला ध्यानीं आपुलिये ॥ १११ ॥मधू देशपांडे भक्त हा बाबांचा । करी नोकरी साचा परोपरी ॥ ११२ ॥थोर ती भावना बाबांचिये ठायीं । याची असे पाहीं सर्वकाळ ॥ ११३ ॥येउनी बाबांपाशीं सेवा तो करीत । बाबा कृपावंत झाले यासी ॥ ११४ ॥कृपा करोनीयां दिधला आशीर्वाद । भजोनि स्वानंद करीं म्हणती ॥ ११५ ॥बाबांसवें यात्रेमाजी हे कीं जाती । यात्रा ते करिती बाबांसंगें ॥ ११६ ॥बाबांचे अनुभव यांसी तेव्हां येता । बाबांसी मानीत दैवत हे ॥ ११७ ॥धुमाळ बिल्डिंगांत परांजपे दादा । बाबांसी सर्वथा मानिताती ॥ ११८ ॥जाती बाबांपाशीं नित्य एक वेळ । दर्शन केवळ घ्यावयासी ॥ ११९ ॥कधीं सांगितल्या करिती हे सेवा । बाबांचे वैभवा काय वानूं ॥ १२० ॥बी. पी. गवळी येत बाबांचे दर्शना । कल्याणाहूनी जाणा कधीं कधीं ॥ १२१ ॥सोळा ताड्यांची ती छत्री त्या सांगती । आणावयाप्रती सद्गुरु बाबा ॥ १२२ ॥तैसे अनुभव यासी आले फार । अंत न कळे पार बाबांचा तो ॥ १२३ ॥दिगंबर दाभोळकर भक्त मुंबईचा । आला दर्शनाचा घेउनि ध्यास ॥ १२४ ॥अधूं त्याची दृष्टी त्यासी सांगताती । तुझ्या दृष्टीप्रती लक्ष माझें ॥ १२५ ॥फिरूं नका पुण्यांत सांडोनिया जाल । स्वस्थ जरि बैसाल तरिच साधेल ॥ १२६ ॥अहमदनगरचे ते वकील भालेराव । परमार्थाची हांव भारी यांसी ॥ १२७ ॥कुळकर्णी महाराज होते गुरु यांचे । चरित्र तयांचें लिहिलें यांनीं ॥ १२८ ॥बाबांचे दर्शना आले हे पुण्यांत । दर्शनानें तृप्त झाले फार ॥ १२९ ॥सुंदरराव नाईक वसती मुंबईस । दर्शनासी खास आले तेथ ॥ १३० ॥हिंगाष्टक-चूर्ण एक बाटलीभर । बाबांनीं सत्वर दिधलें यांसी ॥ १३१ ॥नाईक गणपतराव असती वकील । राहती करुनी घर ग्रँट-रोडासी ॥ १३२ ॥यांच्या घरीं जोडे आहेत स्वामींचे । मिळाले ते यांचे आजोबांसी ॥ १३३ ॥यांचे वडील रामचंद्रपंत । अंगावरी पाजीत स्वामी त्यांसी ॥ १३४ ॥यांचे घरावर कृपा ती स्वामींची । असे कीं प्रेमाची सर्वकाळ ॥ १३५ ॥पांडुरंगराव मरबळळी थोर स्वामिभक्त । मुंबापुरीं वसत ताडदेवास ॥ १३६ ॥अनन्य भावें करिती स्वामिभक्ती । स्वामिचरणीं प्रीती ठेवोनीयां ॥ १३७ ॥स्वामींनींच दिला यांसी ध्यानयोग । अभ्यासें हा योग साधिती ते ॥ १३८ ॥एकोणीसशें त्रेपन्न सालीं बाबा यांसी । कथिती पुण्यास यावयास ॥ १३९ ॥आज मी येईन खालीं उतरोन । घेई तूं दर्शन येउनि तेथें ॥ १४० ॥ऐसा तो दृष्टांत होतांच बाबांचा । मार्ग तो पुण्याचा धरिला त्यांनीं ॥ १४१ ॥साच त्याच दिनीं माडीवरूनी खालीं । बाबांची ती आली स्वारी सत्य ॥ १४२ ॥काळ्याचे गृहास जावोनी बैसले । परी न रमलें चित्त त्यांचें ॥ १४३ ॥सर्वेंच परतोनि आले स्वस्थानासी । धुमाळ बिल्डिंगासी लगबग करुनी ॥ १४४ ॥त्या वेळीं मरबळळी होते त्यांच्या संगें । दर्शनाचे रंगें आनंदले ॥ १४५ ॥देह तो सोडितां बाबांनीं पुण्यांत । अंत्ययात्रेपर्यंत आले हे कीं ॥ १४६ ॥बाबांनीं कथिलें पांडुरंगरावांसी । दोन त्या अस्थींसी काढुनि घ्यावें ॥ १४७ ॥आणि विठोबास द्याव्या तूं त्या अस्थी । म्हणोनियां देती दृष्टांत तो ॥ १४८ ॥दृष्टांताप्रमाणें दोन अस्थीं यांनीं । घेतल्या काढोनी चितेतून ॥ १४९ ॥पुढें एकोणीसशें पासष्ट सालांत । विठ्ठलरावांप्रत देती अस्थी ॥ १५० ॥शास्त्रशुद्धमार्ग करून शुद्धी त्यांची । अस्थी कलशासी ठेवियेल्या ॥ १५१ ॥ऐसी ही समाधी सद्गुरू बाबांची । मुंबापुरीत जी असे आज ॥ १५२ ॥तेथ दररोज होत अनुष्ठान । ब्राह्मणाकडून तीन तास ॥ १५३ ॥करिती पूजाअर्चा भक्तजन सारे । आणि प्रेमभरें दर्शन घेती ॥ १५४ ॥पांडुरंगरावांची मंडळी रुक्माबाई । स्वामिभक्त तीही असे फार ॥ १५५ ॥मरबळळी गेले सोडुनि कलेवर । लक्षुनि स्वर्गद्वार निघूनि गेले ॥ १५६ ॥आज समाधिमंदिरीं असे जें पुण्यांत । तैलचित्र सांप्रत बाबांचें कीं ॥ १५७ ॥तेंचि काढियेलें सावर्डेकरांनीं । चित्रकार म्हणुनी कीर्ती त्यांची ॥ १५८ ॥चित्र रेखितांना त्यांसी तीन वेळ । दिधलें दर्शन सोज्वळ रावसाहेबांनीं ॥ १५९ ॥कांहीं सूचना त्या देवोनियां त्यांसी । चित्राचे पूर्तीसी करवीलें ॥ १६० ॥हेही स्वर्गवासी होवोनियां गेले । बाबांचे जाहले चित्रकार ॥ १६१ ॥प्रताप विश्वास वामन जयंत । दर्शनासी येत येंदे-बंधू ॥ १६२ ॥त्यांचे काका आणि माता तीही येई । दर्शन घेउनि जाई बाबांचें ती ॥ १६३ ॥गजानन गुप्ते महाराजांचे सारे । भक्त हे कीं खरे मुंबापुरीस ॥ १६४ ॥नाना पाठक येती दर्शना बाबांचे । गजानन महाराजांचे भक्त तेही ॥ १६५ ॥डॉक्टर कारखानीस गणेश त्रिंबक । असती उपासक आणि संत ॥ १६६ ॥तांबे-बोळामाजी असे गृह यांचें । दर्शना बाबांचे हेही येती ॥ १६७ ॥बाबा यांसी वदती तुम्ही नाजूक फार । कृपा तुम्हांवर ईश्वराची ॥ १६८ ॥पांडुरंगाचीं हो तुम्ही कीं लेंकुरें । खेळा प्रेमभरें सर्वकाळ ॥ १६९ ॥गजानन गुप्ते महाराज थोर । त्यांचा कृपाकर मस्तकि तुमचे ॥ १७० ॥हुरडा जोंधळ्याचा एक मूठभर । घातला सत्वर यांचे मुखीं ॥ १७१ ॥आजवरी यांसी मिळे ती भाकरी । जोंधळ्याची बरी वेळापुरीं ॥ १७२ ॥कांहीं वेळ राहती हे कीं वेळापुरीं । कांहीं दिनवेरी पुण्यामाजी ॥ १७३ ॥सतत असती रंगोनी स्वरूपीं । वर्तती साक्षीप्री सर्वकाळ ॥ १७४ ॥नसे देहभान चहाची आवडी । तपकिरीची गोडी फार यांसी ॥ १७५ ॥सिद्ध पुरुष हे कीं आज विद्यमान । कृपा यांसी पूर्ण बाबांची कीं ॥ १७६ ॥स्वानुभवानें ते करिती प्रवचन । साधकासी ज्ञान व्हावयासी ॥ १७७ ॥बाबांचे मंदिरीं येती वारंवार । चरणीं भाव थोर असे यांचा ॥ १७८ ॥डॉक्टर हरीभाऊ आठल्ये मुंबईस । मानिती बाबांस फार हे कीं ॥ १७९ ॥त्यांचे कृपेनें ते करिती नोकरी । खाजगी प्रॅक्टिस बरी असे त्यांना ॥ १८० ॥पतिपत्नी दोघें करिती उपासना । मानिती बाबांना अतिशय ॥ १८१ ॥त्रिंबकराव तेंडोलकर वकील मुंबईस । त्यांनी दर्शनास घेतलें कीं ॥ १८२ ॥बाबा असतांना घडलें यां दर्शन । आशीर्वाद मिळून तृप्त झाले ॥ १८३ ॥हेही मानतात बाबांसी बहुत । भाव बाबांप्रत असे यांचा ॥ १८४ ॥इन्कमटॅक्सची हे करिताती प्रॅक्टीस । प्रॅक्टीस ती त्यांस असे बहुत ॥ १८५ ॥विनायकराव भागवत होते ते पुण्यात । धंदा ते करीत पुस्तकांचा ॥ १८६ ॥यथाशास्त्रविधि पूजा त्यांनी केली । बाबांची सगळी प्रेमभरें ॥ १८७ ॥आणि उपासना घेतली मागुन । शिष्य झाले जाण बाबांचे हे ॥ १८८ ॥नित्य दर्शनास येती बाबांपाशीं । त्यजोनी देहासी गेले हे कीं ॥ १८९ ॥गणेश आळेकर नावांचे गृहस्थ । येत कीं असत बाबांकडे ॥ १९० ॥बाबा असतांना पी. डब्लयू. डीं. त । हाताखालीं करित होते काम ॥ १९१ ॥फोटो काढण्याची कला यांचेपाशीं । बाबांचे फोटोसी काढितात ॥ १९२ ॥बहुत तीं चित्रे यांनीं काढियेलीं । बाबांची सगळीं वेळोवेळीं ॥ १९३ ॥नित्य बाबांपाशीं येवोनि बैसत । सेवा ते करीत बाबांची ती ॥ १९४ ॥पेन्शन आणायासी जाती बाबांसंगे । कष्टती निजागें बाबांसाठीं ॥ १९५ ॥पेन्शन यांसी नाहीं झाली शेवटवेरी । पैसा नानापरी मेळविती ॥ १९६ ॥होमिओपाथीची प्रॅक्टीस हे करिती । औषध रोग्यांप्रती देवोनियां ॥ १९७ ॥तुळशीबागेपाशीं राहती पुण्यांत । बाबांसवे जात ठायीं ठायीं ॥ १९८ ॥गणेशनाथ वैद्य थोर सत्पुरुष । होते कीं पुण्यास पूर्वकाळीं ॥ १९९ ॥मटंगे वैद्य म्हणुनी ओळखिती यांसी । होते नोकरीसी रेल्वेमाजी ॥ २०० ॥नाथ-सांप्रदायी होते बाबा वैद्य । उपासना अभेद्य असे त्यांची ॥ २०१ ॥गणेशनाथांचे शिष्य आळेकर । सांप्रदाय थोर नवनाथांचा ॥ २०२ ॥आळेकर गेले देहासी त्यजोन । झाली वर्षे तीन तयांसी तीं ॥ २०३ ॥बेडेकर अनंतराव शिष्य ते बाबांचे । असती मुंबापुरीचे रहिवासी ॥ २०४ ॥चित्रकला आणि कला गायनाची । असे यांजपाशीं उत्तम ती ॥ २०५ ॥बाबांनीं दिधली यांसी उपासना । करिती ते जाणा त्याच रीती ॥ २०६ ॥तरंगती हे कीं पडुनी पाण्यावरी । परी न पाण्याभीतरीं बुडतात ॥ २०७ ॥बाबांचीं तीं पत्रे बहुत मोलाचीं । असती यांचेपाशीं लिहिलेलीं ॥ २०८ ॥द.म. जोशीमास्तर असती एम्.ए., बी.टी. । बाबांची कृपा ती यांसी झाली ॥ २०९ ॥बाबांप्रती हे कीं विचारिती प्रश्न । यांचें समाधान करिती बाबा ॥ २१० ॥यांसी अनुग्रह करुनियां बाबांनीं । एक मास ध्यानीं रंगविलें ॥ २११ ॥राजगुरूनगरीं खेड-मंचरास । मास्तर हायस्कुलास असती हे ॥ २१२ ॥दाढी जटा यांनी असती वाढविल्या । अभ्यासाची वेळा सांधिती हे ॥ २१३ ॥मनीं येई तैसें वागती जगांत । पत्रें यांची येत बाबांसी तीं ॥ २१४ ॥कधीं काळीं येती समाधिदर्शना । रक्षी सद्गुरुणा यांसी सदा ॥ २१५ ॥यांच्या त्या मातोश्री होत्या जोशीणकाकू । मती ज्यांची व्यापक असे फार ॥ २१६ ॥बीडकरमठीं राहती या बाई । बाबांचे ठायीं भाव यांचा ॥ २१७ ॥कांहीं मार्ग दिला यांजला बाबांनीं । गेल्या निवर्तनीं स्वर्गी या कीं ॥ २१८ ॥भालचंद्र बापट आणि विमलाबाई । बीडकरमठीं हीं राहतात ॥ २१९ ॥नाना बापटांची सून चिरंजीव । मठींचें काम सर्व पाहताती ॥ २२० ॥भालचंद्र बापट बीडकर मठाचे । ट्रस्टी हे कीं साचे असती आज ॥ २२१ ॥दोघेही दर्शना जाती बाबांपाशीं । करिती चरणांसी नमस्कार ॥ २२२ ॥द्वारकाताई असे कन्या बापटांची । बीडकरमठीं हिची असे वस्ती ॥ २२३ ॥करूनी ईश्वरभक्ती धरुनी अंतरीं भाव । राहते सदैव मठीं जाणा ॥ २२४ ॥हिजवरी कृपा बाबांची ती फार । बाबा तिसी निरंतर रक्षितांत ॥ २२५ ॥पारखी मास्तर एक भक्त ते बाबांचे । भावे स्कुलीं यांचें नोकरीस्थान ॥ २२६ ॥सद्गुरू बाबांनीं मंत्र यां दिधला । म्हणती परमार्थाला करा आतां ॥ २२७ ॥पिंजऱ्यासहित पोपट असे दिधला यांस । रक्षावा कीं यास सांगोनियां ॥ २२८ ॥यांचे वडील होते भक्त बीडकरांचे । घराणे मूळचें बाळबोध ॥ २२९ ॥दिनकर बोरकर एक भक्त येती । बाबांचे लागती चरणीं ते ॥ २३० ॥नित्य करोनियां जाती दरुशन । अन्न-प्रसाद पूर्ण मिळे यांसी ॥ २३१ ॥बाबांचे गुरुबंधू मोठे मुकुंदराव । दंग जे सदैव स्वरूपानंदीं ॥ २३२ ॥बीडकरांचा मार्ग यांनी चालवीला । शिष्यगण केला इंदुरास ॥ २३३ ॥इंदुरीं राहीन करिती भजनास । होते नोकरीस इंदुरासी ॥ २३४ ॥प्रथम हे होते क्रांतिकारकंांत । खटला यांवरि होत तये काळीं ॥ २३५ ॥बीडकर महाराजांनी सोडविलें यांसी । करुनी अनुग्रहासी स्थिर केलें ॥ २३६ ॥उच्च पातळीस होते हे कीं गेले । बाबांचे हे भले असती स्नेही ॥ २३७ ॥मानिती बाबांना अतीव अंतरीं । वर्णोनियां थोरी सांगती जनां ॥ २३८ ॥अकोल्यासि हे कीं पंचत्व पावले । पुत्राघरीं जाहलें निधन यांचें ॥ २३९ ॥सन एकोणीसशें एकाहत्तर सालीं । यात्रा संपविली इहलोकींची ॥ २४० ॥खेड़ी घाटीं होते नर्मदेच्या तटीं । मोरटक्क्याप्रती मोघे हे कीं ॥ २४१ ॥रानडे शाम बाबा सत्पुरुष थोर । त्यांचे गुरुवर साईनाथ ॥ २४२ ॥रानड्यांसी म्हणती महाराज उद्धवेश । लळा मोघे यांस होता यांचा ॥ २४३ ॥त्यांचेंसंगे मोघे नर्मदेचे तटीं । जावोनी राहती फार वेळां ॥ २४४ ॥दुर्गा दत्तात्रेय फडके नांवाची । मुलगी, बाबांची शिष्या असे ॥ २४५ ॥मुंबई शहरांत राहतसे नित्य । आणि रेलवेत नोकरी करी ॥ २४६ ॥येई बहुत वेळां मुलगी ही पुण्यास । घ्याया दर्शनास बाबांच्या कीं ॥ २४७ ॥आज मुंबईत असे ही राहात । भजे बाबांप्रत भक्तीभावें ॥ २४८ ॥नीळकंठ खरे यांचे मेव्हणे ते एक । पुणे नगरीं देखा वसताती ॥ २४९ ॥यांचे गृहीं बाबा गेले दोन वेळां । बसोनी त्या स्थळा गृहीं आले ॥ २५० ॥बाबांचा तो फोटो आणिक पादुका । विसर्जित देखा जाहल्या ज्या ॥ २५१ ॥तो फोटो आणि पादुकाही त्याच । समाधिमंदिरीं त्याच होत्या पूर्वी ॥ २५२ ॥आतां यांचे घरीं असती वस्तु दोन्ही । ठेविल्या जपोनी त्यांनीं गृहीं ॥ २५३ ॥तळेकर नांवाचे मराठे गृहस्थ । येती बाबांप्रत दर्शनासी ॥ २५४ ॥त्यांसी मार्ग दिला बाबांनी दावोन । तोचि आचरोन असती हे ॥ २५५ ॥दत्तात्रेय आणि रामभाऊ समेळ । असती उतावेळ दर्शनासी ॥ २५६ ॥रामभाऊ राहात होते ते पुण्यांत । बाबा कृपा करित तयांवरी ॥ २५७ ॥आतां निवर्तोन गेले ते स्वर्गास । इहलोकींचा वास संपवोनी ॥ २५८ ॥दत्तोपंत समेळ असती मुंबापुरीत । पती-पत्नी करिती उपासना ॥ २५९ ॥खानवेलकर नामक एक प्रोफेसर । ज्यांचे सद्गुरु गुळवणी ॥ २६० ॥वामनराव मामा असती योगमार्गी । खानवेलकरांलागीं दिधली दीक्षा ॥ २६१ ॥बाबांचे दर्शना येती मधुनी मधुनी । लागति त्यांचे चरणीं मनोभावें ॥ २६२ ॥मोतीवाले लागू येती बाबांकडे । करिती कौतुक कोडें त्यांचें बाबा ॥ २६३ ॥लेले महाराज जे होते कीं वाईस । तेचि गुरु खास असती यांचे ॥ २६४ ॥लागू सर्वठायीं जाताती दर्शना । बहुत महाराजांना भेटायासी ॥ २६५ ॥बाबांचे गुहांत यांचें येणें जाणें । स्नेहाचेनि गुणें होतें फार ॥ २६६ ॥रायरीकर रबडे नारायण महाराजांचे । शिष्य हे प्रेमाचे असती जाणा ॥ २६७ ॥केडगावीं जाती सेवा करावयास । राहती तेथें खास महिना महिना ॥ २६८ ॥बाबांपाशीं असे स्नेह यांचा बरा । बाबांच्या घरा येती ते कीं ॥ २६९ ॥बाळासाहेब भिडे आणि ब्रह्मेकाका । घेती लाभ निका दर्शनाचा ॥ २७० ॥बहुत दिन येती बाबांसी भेटती । वंदन चरणांप्रती करिती भावें ॥ २७१ ॥मुरलीधर भोर वसती कल्याणांत । कृपा तयांप्रत बाबांची कीं ॥ २७२ ॥त्यांसी मार्ग देती बाबा ते सद्गुरू । व्हाया पैलपारू भवब्धी हा ॥ २७३ ॥भोर बाबांसंगें यात्रेमाजी जाती । आणि लाभ घेती सहवासाचा ॥ २७४ ॥प्रेमभावें घालुनी चरणीं लोटांगण । भक्तिभावें जाण भजताती ॥ २७५ ॥वासुदेव तथा बाळ पानवळकर । असती दुकानदार पुण्यामाजी ॥ २७६ ॥अच्युतमामा यांचे पितृव्य ते जाणा । शिष्य बीडकरांना होते जे कीं ॥ २७७ ॥बाळ पानवळकरांसी बाबा बोलावीत । फोटो त्यांसी देत गुरूबधूंचा ॥ २७८ ॥अच्युतमामांचा फोटो तो देवोन । म्हणती करा पूजन यांचें तुम्ही ॥ २७९ ॥समाधिमंदिरांत करिती हे सेवा । प्रतिदिनीं बरवा धरुनी भाव ॥ २८० ॥पत्नी कन्या सुत स्नुषा आणि नातू । बाबांवरी धरितु भक्तिभाव ॥ २८१ ॥मंदिरस्थळासी सकळहि येवोन । दरुशन घेऊन करिती कामें ॥ २८२ ॥गजानन भाटवडेकर आणि येसुताई । वसती बाबांगृहीं सानपर्णी ॥ २८३ ॥बाबांचा सहवास लाभला तयांस । कृपापात्र खास झालीं तीं कीं ॥ २८४ ॥येसुताई येती कधीं कधीं पुण्यास । समाधिमंदिरास दर्शनार्थ ॥ २८५ ॥गजानन भाटवडेकर असती मुंबापुरीं । कृपा त्यांचेवरी बाबांची ती ॥ २८६ ॥बळवंतराव कुळकर्णी बाबांघरीं होते । वांद्र्यासी जैं होते सद्गुरू बाबा ॥ २८७ ॥करोनी नोकरीचा तो व्यवसाय । राहण्याची सोय गृहीं बाबांचे ॥ २८८ ॥यांचे पाशीं असती आठवणी बाबांच्या । सांगती त्या साच्या प्रेमभावें ॥ २८९ ॥रामचंद्र भागवत अहमदाबाद् नगरीं । राहती सेवाधारी बीडकरांचे ॥ २९० ॥तेही स्वरूपध्याना नित्य अभ्यासिती । होतसे प्रगती थोडी थोडी ॥ २९१ ॥सद्गुरू बाबांनीं अंतकाळीं त्यांस । स्वप्न-दर्शनास दिधलें जाणा ॥ २९२ ॥यांचा असे भाव बाबांच्या चरणीं । मंदिरीं येवोनी दर्शन घेती ॥ २९३ ॥मंगळवेढेकर महाराजांचे शिष्य । भिडे होते खास पुण्यामाजी ॥ २९४ ॥शिवमन्दिरीं नांतूचे नित्य हे राहात । खोली घेऊनि तेथ जवळीच ॥ २९५ ॥उदरनिर्वाहास करिती शिवणकाम । वाचनाचा नेम गुरुचरित्राचा ॥ २९६ ॥सात दिनीं करिती गुरुचरित्र सप्ताह । क्रम त्यांचा कीं हो बहुकाळींचा ॥ २९७ ॥एक हजार आठ केलीं पारायणें । सप्ताह - वाचनें करुनी यांनीं ॥ २९८ ॥प्रतिदिन मागती मधुकरी पुण्यांत । आणि चालवीत योगक्षेम ॥ २९९ ॥बाबा रोज रात्रीं दूध पावशेर । भिड्यांसी निर्धार करुनी देती ॥ ३०० ॥फार वर्षे ऐसा नेम हा चालला । गुरुंनी तोषविला ब्राह्मण हा ॥ ३०१ ॥दोन वर्षांपूर्वी गेले हे मरोन । देहातें त्यजोनी पुण्यामाजी ॥ ३०२ ॥एकुणपन्नास पन्नास सालीं नाना फडके । आले ते कीं निके बाबांपाशीं ॥ ३०३ ॥नारायण रघुनाथ असे त्यांचें नांव । त्यांचा थोर भाव बाबांवरी ॥ ३०४ ॥शोधीत शोधीत आले धुमाळ बिल्डिंगांत । दर्शनानें तृप्त जाहले ते ॥ ३०५ ॥दर्शन घेवोन गेले स्वगृहास । परी चैन त्यांस न पडे गृहीं ॥ ३०६ ॥पुनरपि परतोन लागोलाग आले । पायांशीं बैसले सद्गुरुच्या ॥ ३०७ ॥गुरुचरित्राचें करिती हे वाचन । माता-वडील पूर्ण सुसंस्कृत ॥ ३०८ ॥सप्तशती-पाठ करिती प्रतिदिन । वडील यांचे जाण बहुकाळ ॥ ३०९ ॥गुरुचरित्राचे तेही सप्त करिती । धर्मशास्त्रीं प्रीती त्यांची भारी ॥ ३१० ॥नाना फडक्यानंचें बहुतचि वाचन । करिती बहुतचि प्रश्न बाबांसी ते ॥ ३११ ॥दर्शन होतां झाला क्रम तो नानांचा । स्थानीं बैसण्याचा सद्गुरूंचे ॥ ३१२ ॥एकदिन झालें तेजोदर्शन यांसी । सद्गुरुकृपा त्यांसी झाली जाणा ॥ ३१३ ॥चोवीस कलाक दिठीपुढें तेज । न सुचे काम-काज त्यांसी कांहीं ॥ ३१४ ॥बाबांसी पुसती काय ऐसें झालें । मन माझें गेलें भांबावोन ॥ ३१५ ॥मग आपेंआप गेलें मावळोन । ठायींच झालें लीन आपेंआप ॥ ३१६ ॥तैंपासानियां प्रतिदिनीं अभ्यास । करिती हे खास स्वरूपाचा ॥ ३१७ ॥यांसी क्षणोक्षणीं अनंत अनुभव येती । लिहावयाप्रती स्थळ ना येथ ॥ ३१८ ॥गोकर्ण यात्रेसी बाबांसंगे गेले । तेथें अनुभव आले त्यांसी फार ॥ ३१९ ॥एस्. डी. ओ. हेडालेबाबांचेकृपें । एक्झीक्यूटिव्हइंजिनीअरहोणेंघडलेंपुढती ॥ ३२० ॥आज यां नोकरी स्टेट बँकेमाजी । एक्झीक्यूटिव्ह इंजिनीअरची असे जाण ॥ ३२१ ॥लोणी आणि ताक दररोज बाबांना । पोंचविती जाणा गोखले हातीं ॥ ३२२ ॥सेवा वर्षे तीन चालविली यांनीं । पुढें तो बाबांनीं त्यजिला देह ॥ ३२३ ॥यांचे अनुभव असती थोर थोर । येतील समग्र चरित्रांत ॥ ३२४ ॥बाबांचे कृपेनें संसारीं राहोनि । करिती हे साधन परमार्थाचें ॥ ३२५ ॥क्षयरोगांतोनि ह्यांच्या बंधूलागीं । बरा केला चांगी करूनि कृपा ॥ ३२६ ॥शस्त्रक्रिया त्याची यशस्वी जाहली । नानां साह्यकारी असती बाबा ॥ ३२७ ॥गोविंदराव जोगळेकर शिष्य हे बाबांचे । मूळ हे पेणेचे असती जाणा ॥ ३२८ ॥असतां हे पुण्यांत येती दर्शनास । मागती परमार्थोस बाबांपाशीं ॥ ३२९ ॥मिलिटरीमाजी यांची ती नोकरी । चालतसे बरी देहरोडीं ॥ ३३० ॥तेथोनियां येती दर्शन करायास । साधोनी संधीस गोविंदराव ॥ ३३१ ॥एकदां युरोपियन साहेब वरिष्ठ । असे जो कीं खाष्ट बहुतची ॥ ३३२ ॥तपासणीसाठीं येवोनी पातला । चमत्कार केला बाबांनीं तो ॥ ३३३ ॥इतर गोष्टीमाजीं गुंतला साहेब । दाखीवत आब इतरांसी ॥ ३३४ ॥यांच्या तुकडीची न करी तपासणी । गेला परतोनी साहेब तो ॥ ३३५ ॥ड्रेस उतरोन गोविंदराव आले । दर्शना पातले सद्गुरूंच्या ॥ ३३६ ॥बाबा पुसताती साहेबा काय झालें । गोविंदराव बोले परतुनी गेला ॥ ३३७ ॥बाबांनीं एकदां गोविंदरावास । चहा करायास् आज्ञापिलें ॥ ३३८ ॥खिडक्या दरवाजे असती बंद सारे । गोविंदराव त्वरें विस्तव करीत ॥ ३३९ ॥फुं फुं करुनी शेगडी पेटवीत तेव्हां । परी न विस्तवा मर्जी लागे ॥ ३४० ॥धूर झाला भारी सर्वही खोलींत । नाकीं तोंडीं जात गोविंदरावांचे ॥ ३४१ ॥बाबा न दिसती कोठें ते बैसले । परी तये वेळे घडलें भव्य ॥ ३४२ ॥अत्यंत तेजस्वी हिरे चमकती । दिसे नयनप्रती गोविंदरावा ॥ ३४३ ॥तेज न देखवे नयनीं तें थोर । संपोनियां धूर गेला मग ॥ ३४४ ॥गोविंदरावें केला चहा मग तेथ । बाबा म्हणतात पी रे बाळा ॥ ३४५ ॥गोविंदराव जातां कसबा गणपतीस । तेजस्वी मूर्तीस देखे नयनीं ॥ ३४६ ॥तेथें ही तेजाची आली कीं प्रचीती । प्रेमें दर्शन देती गणपती त्यांस ॥ ३४७ ॥पेणचे घरांत गोविंदराज मूर्ती । दिसे नयनांप्रती हास्यमुख ॥ ३४८ ॥मोठी झाली ऐसें गोविंदरावांस । दिसलें स्वगृहास पेणेमाजीं ॥ ३४९ ॥बाबांनीं टाळिला अपमृत्यू त्यांचा । विवाह तो त्यांचा पुढें झाला ॥ ३५० ॥पत्नी आणि मुलींसह मुंबईत । आज हे राहात विक्रोळीस ॥ ३५१ ॥मिलिटरींतोन घेवोनि पेन्शन । सिक्युरीटी ऑफिसर म्हणोन करिती सेवा ॥ ३५२ ॥टाटा मेमोरिअल हॉस्पिटलांत नोकरी । गोविंदराव करिती सांप्रत ते ॥ ३५३ ॥गुरुकृपें असे त्यासी समाधान । अभ्यास प्रतिदिन करिती ते ॥ ३५४ ॥के.डी. गद्रेभाऊ शिष्य हे बाबांचे । रत्नागिरीस साचे राहताती ॥ ३५५ ॥मिलिटरी अकौंट्स माजी होती नोकरी यांना । रिटायर होती जाणा कराचीहूनि ॥ ३५६ ॥पुण्यास असतां बाबा यांचे घरीं । भोजना केव्हां तरी असती जात ॥ ३५७ ॥हेही बहुतेक जाती दर्शनास । मुलगू म्हणती यांस सद्गुरु बाबा ॥ ३५८ ॥अनुग्रह यांसी करुनी रावसाहेबांनीं । परमार्थसाधनीं लावियेलें ॥ ३५९ ॥यांचे मंडळीस म्हणती सद्गुरुबाबा । आईसाहेब ते गा कांहीं वेळां ॥ ३६० ॥यांसी अनुभव येती पदोपदीं । असे यांची बुद्धी चमकदार ॥ ३६१ ॥विनोदी बोलणें लक्षोनियां मर्म । न कळे धर्माधर्म यांसी कांहीं ॥ ३६२ ॥गुरुचरित्राची यांसी प्रीती फार । ससे वारंवार करिताती हे ॥ ३६३ ॥जपाचें लेखन आणिक तें ध्यान । राहिले करुन रत्नागिरींत ॥ ३६४ ॥जमीन विकोन रुपये लक्षावधी । मिळती थोड्या अवधीमाजीं यांसी ॥ ३६५ ॥दत्तमूर्ती आणि बाबांसी सेविती । अंबाबाई प्रती भजते पत्नी ॥ ३६६ ॥विष्णुपंत नामें जे कीं चिपळूणकर । त्यांसी सद्गुरुवर कृपा करिती ॥ ३६७ ॥मंत्र-जप आणि ध्यान-मार्ग देती । बाबा तयांप्रती कृपा करुनी ॥ ३६८ ॥बर्मा शेलमाजीं असे यां नोकरी । रिफायनरीमाझारी करिती काम ॥ ३६९ ॥बाबांचे कृपेनें धन सुत दारा । मिळोनि संसारा करिती हे ॥ ३७० ॥यांसी अनुभव येतात बाबांचे । नित्य ते कृपेचे बहुतची ॥ ३७१ ॥अर्वाच्य हा विष्णू बनोनी सज्जन । सद्गुरु कृपाघनयुक्त झाला ॥ ३७२ ॥अनेक इतर भक्त सहस्रावधी । बाबांसी भजती सर्वां ठायीं ॥ ३७३ ॥न कळे कैसे कोठें असती ते कोण । बाबाच जाणोन असती त्यांसी ॥ ३७४ ॥खरे खोटे आम्ही कासया म्हणावें । ज्यांचें त्यांस ठावें अंतरंगीं ॥ ३७५ ॥ऐसे सद्गुरु बावा यात्रा संपवोन । आले परतोन पुण्यामाजी ॥ ३७६ ॥प्रवासाचा शीण होवोनियां फार । तापाने जर्जर शरीर झालें ॥ ३७७ ॥नित्याचा बाबांचा आहार अगदीं थोडा । तोही त्यांनी पुढां सांडियेला ॥ ३७८ ॥पडती न बाहेरी गृहींच राहात । दर्शनासि येत भक्त बहु ॥ ३७९ ॥दिसेंदीस प्रकृती चालली खंगत । परी दर्शनार्थ भक्त येती ॥ ३८० ॥कोणीतरी द्वारीं लाविलें पाटीस । न या दर्शनास म्हणुनी तेव्हां ॥ ३८१ ॥परी दर्शनार्थ येती जे जे कोणी । त्यां त्यां सद्गुरूंनीं दर्शन दिधलें ॥ ३८२ ॥निळकंठराव खरे आणि निर्मलाबाई । येवोनियां तेही भेटुनि गेले ॥ ३८३ ॥“शंकर नाम सुधा” ऐसें लिहोनियां । ग्वाही भक्तांसी या देती बाबा ॥ ३८४ ॥“धाता यथापूर्वमकल्पयत्” ऐसें लिहवोन । ठेविती लावोन सद्गुरु बावा ॥ ३८५ ॥बाबांच्या अंगांत भडकली उष्णता । बिछान्याभोंवता ठेविती बर्फ ॥ ३८६ ॥वस्त्रें ओलीं करून घेती अंगावरी । परी शेवटवेरी सावध होते ॥ ३८७ ॥शेवटवेरी चाले स्वरूप-अनुसंधान । विदेही ते पूर्ण सद्गुरु बाबा ॥ ३८८ ॥देवोनियां पैसे नरहरि काळ्यांस । बाबा वदले त्यांस अभिषेक् करा ॥ ३८९ ॥मोदी गणपतीवरी सहस्रावर्तनें करिती । सद्गुरु सांगती म्हणोनियां ॥ ३९० ॥काळ्यांनी आणिले तीर्थप्रसादास । प्राशिती तीर्थास सद्गुरु बाबा ॥ ३९१ ॥किंचित् प्रसाद मुखांत घालोन । दिधलें पाठवोन सर्वासीही ॥ ३९२ ॥म्हणती भोजनें सारोनियां येणें । आतां घरीं जाणें सर्वांनीं ॥ ३९३ ॥डॉ. खेर, दातार, नरहरी काळे । स्वगृहीं सगळे परतले ॥ ३९४ ॥स्वगृहीं उपवास सोडोनियां आले । पुनरपि पातले सद्गुरुस्थानीं ॥ ३९५ ॥ते काळीं सद्गुरु स्वस्थ ते बैसले । दृष्टीतें लाविलें भ्रूमध्यासी ॥ ३९६ ॥बारा अठ्ठावीस वाजतां बाबांनीं । देह तो त्योजोनी गेले बाबा ॥ ३९७ ॥प्राणज्योत त्यांची ब्रह्मस्वरूपांत । झाली लीन तेथ मध्यरात्रीं ॥ ३९८ ॥श्रावण वद्य चतुर्थी होता मंगळवार । सद्गुरूंनीं अवतार संपवीला ॥ ३९९ ॥शके अठराशें शहातरामाजीं । बाबांनीं सहजीं त्यजिला देह ॥ ४०० ॥दिनांक तो होता अठरा ऑगस्ट । एकोणीसशें चौपन्न असत सन तेव्हां ॥ ४०१ ॥पुढील सकल यात्रेची ती कथा । जाहलों लिहिता पूर्वाध्यायीं ॥ ४०२ ॥अनाथांचा नाथ दीनांचा कैवारी । सान्तातोंनी स्वीकारी अनन्तत्व ॥ ४०३ ॥वासुदेवानंतसरस्वती नाहीं ते कीं गेले । भरोनि राहिले विश्वीं साऱ्या ॥ ४०४ ॥असती सकलांचे अंतरांत तेची । जैसा भाव ज्यांसी तैसे दिसती ॥ ४०५ ॥समाधिस्थानांत राहीन मी नित्य । ऐसा वर सत्य दिधला त्यांनीं ॥ ४०६ ॥एक सहस्त्र वर्षे राहीन मी येथ । कल्याण करीत भक्तांचें ॥ ४०७ ॥ऐसें आश्वासन सद्गुरु बाबांचें । सकळिकां साचें असे जाणा ॥ ४०८ ॥देह गेला तरी बाबा वसती तेथ । दिनरात येत प्रचीती ही ॥ ४०९ ॥समाधि-मंदिरीं राहोनी तारीन । आणि उद्धरीन सकळिकां ॥ ४१० ॥ऐसी भाक त्यांची धरावी सकलांनीं । उपासना करुनी भजनें नित्य ॥ ४११ ॥सांडोनी अहंता लागावें चरणीं । तन मन धनानीं सर्वस्वेंसीं ॥ ४१२ ॥ऐसी करितां भक्ती सद्गुरु प्रसन्न होती । बरवें ज्ञान देतीं सद्भक्तांसीं ॥ ४१३ ॥समाधिमंदिरांत विश्वनाथ वझे । सेवेलागीं असे आज तो कीं ॥ ४१४ ॥धरुनी श्रद्धा थोर करितो सेवा फार । सद्गुरु उद्धार करितिल त्याचा ॥ ४१५ ॥दत्ता आंबेटकर तोही सेवा करित । होईल पुनीत सेवेनें तो ॥ ४१६ ॥जे जे भक्तजन येती सेवेसाठीं । तयांसी रक्षिती सत्यचि बाबा ॥ ४१७ ॥परी छलक बुद्धी नसावी ती आंत । नास्तिका न होत प्राप्त कांहीं ॥ ४१८ ॥निष्ठा श्रद्धा भक्ती असतां भक्तापाशीं । सद्गुरु तयासी इष्ट देती ॥ ४१९ ॥शिष्य सद्गुरुंचा जोशी या कुळींचा । पुत्र गणेशाचा विठ्ठलशर्मा ॥ ४२० ॥सद्गुरु बाबांचे आज्ञे तेथें राही । कार्य करवुनि घेई सद्गुरुराज ॥ ४२१ ॥सद्गुरु बाबांचें चरित्रलेखन । कराया कोण समर्थ असे ॥ ४२२ ॥त्यांचें त्यांनीं चरित्र घेतलें लिहवोन । तत्पदीं समर्पण करीत असें ॥ ४२३ ॥बाळ पानवळकर लेखक जाहला । याच चरित्राला सर्वभावें ॥ ४२४ ॥आतां सद्गुरुपायीं करितों विनवणी । कृपा पूर्णपणीं असों द्यावी ॥ ४२५ ॥विश्वीं जीवमात्र सुखी होवो सारा । वाढी जो जें खरा तें तो लाभो ॥ ४२६ ॥दुर्वासना दुष्टांची जावी निरसोन । तयां द्यावी पूर्ण सद्वासना ॥ ४२७ ॥खळांची दुर्बुद्धी नाशावी सकळ । जावे मनोमळ धुवोनीयां ॥ ४२८ ॥चालते बोलते संत जे सज्जन । ईश्वरमूर्ती पूर्ण जगीं जे कीं ॥ ४२९ ॥सकळांसी तयांची संगती कीं व्हावी । आवडी उपजावी परमार्थींची ॥ ४३० ॥आत्मस्वरूपाचें लागो सकळां ध्यान । सकळ विश्व भजन करो त्यांचें ॥ ४३१ ॥इह-पर सुखी होवोनी सकळ । भक्ती ती केवळ करोत कीं ॥ ४३२ ॥सनातन वैदिक धर्म हा वाढावा । उत्कर्ष तो व्हावा भारताचा ॥ ४३३ ॥सकळ मंगळ द्यावें सकळांसी । इच्छितों वरासी द्याची एका ॥ ४३४ ॥तुमचे चरित्राचें करिती जे पठण । तयां संरक्षण द्यावें तुम्हीं ॥ ४३५ ॥परमार्थींत गती होवो वाचकांची । आणि श्रद्धा त्यांची वाढी लागो ॥ ४३६ ॥सद्गुरु वदती वर हा दिधला । तुझे प्रार्थनेला परिसोनी ॥ ४३७ ॥वासुदेवानंतसरस्वती सद्गुरुबाबा । रावसाहेब तेचि बा असती जाणा ॥ ४३८ ॥अनंत कोटी प्रणाम करोनियां चरणीं । लोळतसें धरणीं भक्तिभावें ॥ ४३९ ॥समाप्तीचा दिन असे रविवार । षष्ठी तिथी थोर असे ती कीं ॥ ४४० ॥परिधावी नाम असे संवत्सर । आषाढ मासीं चरित्र संपविलें ॥ ४४१ ॥शुक्लपक्षीं दिन सोळा जुलई तो । एकोणीसशें बहात्तर येतो सन ऐसा ॥ ४४२ ॥शके अठराशें चौऱ्याण्णवामाजी । मुंबईपुरीमाजी लेखन झालें ॥ ४४३ ॥दास म्हणे संक्षिप्त सद्गुरुचरित्रीं । द्वादशाध्याया झाली समाप्ती ही ॥ ४४४ ॥येथून ऐका