संक्षिप्त सद्गुरू चरित्रअध्याय १११:०५ॐकारस्वरूपा अनादी अनंता । तीनही जगतां तूंचि मूळ ॥ १ ॥चारी वेदां मूळ तूंचि विश्वाधार । तुज नमस्कार सर्वभावें ॥ २ ॥वेद प्रतिपादी तुज एकल्यासी । तुज तूं जाणसी स्वयमेव ॥ ३ ॥तूंचि बा गणेश बुद्धिदाता एक । मतिप्रकाशक स्वयमेव ॥ ४ ॥सगुण निर्गुण नटतोसि तूं रे । विश्वाच्या व्यवहारें सकळही ॥ ५ ॥विघ्नविनाशका वंदितों चरणीं । साह्य व्हावें झणी मज आतां ॥ ६ ॥सद्गुरूथांचें करणें गुणगान । हेतु हा धरोन प्रार्थितसें ॥ ७ ॥गुरुचरित्राचें करावें लेखन । म्हणोनियां जाण सिद्ध झालों ॥ ८ ॥प्रगल्भ ती बुद्धी द्यावी गजानना । चरित्रलेखना बालकासी ॥ ९ ॥तुझा आशीर्वाद असतांच शिरीं । मुका असे तरी, बोले वाणी ॥ १० ॥वाणीचा विलास करीं अभिनव । चातुर्य वैभव अर्थ दावी ॥ ११ ॥ऐसी जे शारदा मोहिनी विश्वाची । नमितों मी साची मनोभावें ॥ १२ ॥वाणीचें वैभव तीच विस्तारील । कथोनि दावील गुरुलीला ॥ १३ ॥गणेश तो पिता जानकी ते माता । वंदीतसें माथा नमवोनी ॥ १४ ॥लक्ष्मीकेशव कुलदेव थोर । तया नमस्कार असो माझा ॥ १५ ॥अंबेजोगाईची माता जोगेश्वरी । कुलदेवी सत्त्वरीं नमियेली ॥ १६ ॥सीता आदिशक्ती श्रीराम दैवत । आणि हनुमंत नमस्कारीं ॥ १७ ॥माझीये गृहींची उपास्य दैवतें । तयां एकचित्तें वंदन हें ॥ १८ ॥महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती । आणिक सर्वें ती व्याघ्रांबरी ॥ १९ ॥भराडीण आणि देव रामेश्वर । वंदितों मी थोर ग्रामदेवां ॥ २० ॥दत्त अवधूत पंथींचें दैवत । करितों दंडवत त्याचे चरणीं ॥ २१ ॥लोळोनियां पायीं मागतसें दान । आशीर्वाद पूर्ण द्यावा मज ॥ २२ ॥प्रथमपासोनि तुज उपासितों । सर्वत्र नमितों तुज एका ॥ २३ ॥सद्गुरुचरित्र मुखीं वदवावें । आशीर्वचन द्यावें हेंचि मज ॥ २४ ॥श्रीपाद श्रीवल्लभ दत्तअवतार । प्रार्थोनि सत्वर वंदियेले ॥ २५ ॥नृसिंहसरस्वती गाणगापुरासी । वसती दिननिशीं सर्वकाळ ॥ २६ ॥तेचि अक्कलकोटीं स्वामी कीं समर्थ । भक्त मनोरथ पुरविती ॥ २७ ॥नृसिंहसरस्वती तेंचि असे नाम । अक्कलकोट धाम तयांचेंची ॥ २८ ॥एकचि अवतार वर्तें दोन स्थानीं । निःशंक बनोनी जाणावें हें ॥ २९ ॥तयांचे चरणीं करोनि प्रणिपात । मागतसें नित्य आशीर्वाद ॥ ३० ॥सद्गुरुचरित्र वाणीसी वर्णाया । शक्ती द्या सदया मजलागीं ॥ ३१ ॥सर्वभावें तुमचे चरणीं मी लीन । करोनि घ्या पूर्ण चरित्र हें ॥ ३२ ॥मम सद्गुरुंचें रामानंद गुरु । करितो नमस्कारु त्यांचे चरणीं ॥ ३३ ॥त्यानीं बोध केला सद्गुरु बाबांसी । संप्रदाय त्यांसी देवोनियां ॥ ३४ ॥स्वरूपसंप्रदायीं केलें तत्वदर्शीं । हस्त मस्तकासी ठेवोनियां ॥ ३५ ॥रामानंद गुरो कृपा ते करावी । कथा वदवावी सद्गुरुंची ॥ ३६ ॥संक्षिप्त चरित्र सद्गुरु बाबांचें । वर्णावया वाचे शक्ती द्यावी ॥ ३७ ॥वारंवार माथा ठेवोन चरा । प्रार्थों क्षणक्षणीं तयांलागीं ॥ ३८ ॥आतां अभिनव थोर नवलाव । दावी जो कीं देव वंदूं त्यासी ॥ ३९ ॥हृदयमंदिरीं वसे निरंतर । जो कीं परात्पर सद्गुरुराय ॥ ४० ॥जगताचा आदि अंत जया ठावा । तया सद्गुरुरावा काय वानूं ॥ ४१ ॥माझिये हृदयीं वसे जो कीं नित्य । ज्याचेनि अनित्य जळूनी जाय ॥ ४२ ॥जयाचे कृपेंनें संसार-सागरु । तरुनी पैलपारु जाती जीव ॥ ४३ ॥मनोमंदिरांत हृदयसिंहासनीं । सद्भावें पूजोनी प्रार्थितसें ॥ ४४ ॥सद्गुरु माउली तुझी कृपादृष्टी । कारुण्यें अधिष्ठी जयालागीं ॥ ४५ ॥सकळही विद्या वसती त्यापाशीं । ऋद्धिसिद्धि दासी होती त्याच्या ॥ ४६ ॥नवनिधी त्याचे जवळी वसत । सकळ कळा येत आश्रयासी ॥ ४७ ॥ऐशी श्रीसद्गुरु माउली तूं थोर । देई मज वर त्वरें आतां ॥ ४८ ॥अपार अनंत चरित्र हें तुझें । वर्णावया माझें बळ थोडें ॥ ४९ ॥परी उद्भवली इच्छा हे मानसीं । संक्षिप्त चरित्रासी वर्णावया ॥ ५० ॥बैसोनी हृदयीं तूंचि वदवावें । चरित्र आघवें गुरुराया ॥ ५१ ॥मम वैखरींत नवरस भरीं । शब्दसृष्टी करीं सुशोभित ॥ ५२ ॥अलंकार आणि रूपकें अपार । भरोनियां थोर वदवावीं ॥ ५३ ॥शब्दरत्नांचें हें वाणीचें भांडार । त्यांचि अपरंपार उफाळावें ॥ ५४ ॥माझिये मराठी भाषेमाजीं आतां । प्रमेय खाणी ताता! वाढवाव्या ॥ ५५ ॥भावाचा फुलोरा भरोनियां येथ । रिझवावें चित्त सज्जनांचें ॥ ५६ ॥सकळ सिद्धांत दावीं ठायीं ठायीं । संतजन जीहीं तोषतील ॥ ५७ ॥विवेकवल्लीची करावी पेरणी । जेणें उकलणी गूढार्थाची ॥ ५८ ॥सिद्ध अर्थ हाचि वदवोनि दावीं । मनें तोषवावीं सद्भक्तांचीं ॥ ५९ ॥जयाचेनि जाई पाखंड निरसोन । कुतर्क फिटोन जाई जेणें ॥ ६० ॥तुझें वाचिंतांचि संक्षिप्त चरित्र । मानस पवित्र होवो तेणें ॥ ६१ ॥ब्रह्मविद्या-बोध सकळ जीवांइसी । गातां चरित्रासी होवो माये ॥ ६२ ॥नास्तिकांचें बंड अपैसें निवेलो । ऐशी हे अमोल वदवीं कथा ॥ ६३ ॥कृपाकर माथां जरी तूं ठेविसि । तरी चरित्रासी वदेन गा ॥ ६४ ॥सकळ जीवांइसी होईल आनंदू । ऐसा रसास्वादू पाववीन ॥ ६५ ॥काना वचनाचे भेटीसवें जीवा । वाचिंतांचि व्हावा स्वानंदू तो ॥ ६६ ॥ह्याचसाठीं फार बोलिलों लडिवाळा । पुरवावी आळ आतां माये ॥ ६७ ॥ऐसें प्रार्थोनियां लोळतों चरणीं । सर्वस्वें करोनी एकचित्त ॥ ६८ ॥तंव थोर झाला काय नवलाव । प्रगटला देव अंतरांत ॥ ६९ ॥धरोनियां रूप सगुण साकार । आलिंगिलें पोर हृदयासी ॥ ७० ॥वदती किती हा करिसी प्रस्ताव । अंतरींचा भाव जाणोनियां ॥ ७१ ॥ठेवोनियां माथां कर वदताती । कथा हे निश्चितीं वदवीन ॥ ७२ ॥संक्षिप्त हें सार सांगावें चरित्र । मानसें पवित्र होती जेणें ॥ ७३ ॥हृदयीं बैसोन मीच वदवीन । निःशंक हे पूर्ण भाख घेई ॥ ७४ ॥करोनी निमित्त तुजलागीं येथ । मीच लिहवीत चरित्र हें ॥ ७५ ॥संक्षिप्त हें आतां वदवितों बाळा । पुढें कवणें काळा करीन मोठें ॥ ७६ ॥प्रेमभरें ऐसें वदोनि वचन । आशीर्वाद पूर्ण दिधलासे ॥ ७७ ॥अंतर्धान मग पावले हृदयीं । स्वरूपाचे ठायीं मिसळोन ॥ ७८ ॥सकलही देव आणिक दैवतें । झाले वरदाते ग्रंथासी या ॥ ७९ ॥शेखीं संत आणि महंतां प्रार्थिलें । अवधान भलें द्यावें तुम्हीं ॥ ८० ॥ज्ञानदेव आणि नामदेव संत । तैंवी एकनाथ तुकाराम ॥ ८१ ॥स्वामी रामदास ययांसि प्रार्थिलें । आणिक वंदिले सर्वभावें ॥ ८२ ॥मम सद्गुरुंचें संक्षिप्त चरित्र । वदवा शब्दीं चित्र उमटवोनी ॥ ८३ ॥तोषोनियां सारे देती आशीर्वचन । ग्रंथ परिपूर्ण होईल गा ॥ ८४ ॥नको करूं कांहीं चिंता मानसांत । तव शिरीं हात सद्गुरूंचा ॥ ८५ ॥निवांत राहोनि करावें लेखन । तेणें सकळ जन संतोषती ॥ ८६ ॥ऐसे आशीर्वाद करोनियां प्राप्त । केली सुरवात लेखनासी ॥ ८७ ॥जें जें असे ठावें तें तेंचि लिहावें । ऐसें मनोभावें निर्धारिलें ॥ ८८ ॥अंतरीं सद्गुरु जैसें वदविती । तैसेंचि निघती बोल येथ ॥ ८९ ॥तेचि शब्द लेखीं लिहितसे हात । सत्य मनोगत जाणावें हें ॥ ९० ॥सद्गुरुचरित्र वर्णाया यथार्थ । कोण तो समर्थ असे जनीं ॥ ९१ ॥त्यांचिये सत्तेनें त्याचे गुण गाणें । कृतार्थ करणें जीवन हें ॥ ९२ ॥धरेचा कागद करोनियां येथ । मेरू लेखणीप्रत योजियेला ॥ ९३ ॥सागराची शाई करोनियां सारी । लेखन अवनीवरी मांडियेलें ॥ ९४ ॥तरी तें सद्गुरुचरित्र अपार । न लगे ज्याचा पार कवणासीही ॥ ९५ ॥ब्रह्मा विष्णु शिव थकोनियां गेले । देवांदिकां न कळे सद्गुरुमहिमा ॥ ९६ ॥केवीं तें शब्दांनीं करावें लेखन । शब्द अपुरे जाण वर्णनासी ॥ ९७ ॥मन बुद्धि चित्त मावळतें जेथ । अहंता गळत आपेंआप ॥ ९८ ॥ऐसें तें अचिंत्य काय हो बोलावें । मौन स्वीकारावें हेंचि भलें ॥ ९९ ॥परी बोलविता गुरुनाथ माझा । संक्षिप्त कथेचा भाग हा कीं ॥ १०० ॥प्रथम अध्याय मंगलाचरण । आणिक नमन सकळांसी ॥ १०१ ॥लिहविला त्यांनीं बालकाचे हातीं । झाली जाणा पूर्ती अध्यायाची ॥ १०२ ॥दास म्हणे संक्षिप्त सद्गुरुचरित्रीं । गोड पूर्ती झाली प्रथमाध्यायीं ॥ १०३ ॥येथून ऐका