संक्षिप्त सद्गुरू चरित्रअध्याय ३१२:३२नारायणराव करितां नोकरी । गेले हुबळीक्षेत्रीं बदलोनी ॥ १ ॥तेथे लक्ष्मीबाई लाधल्या गर्भास । जन्म सद्गुरूंस द्यावयासी ॥ २ ॥मासोमासीं होती सुखद डोहळे । लक्षणें सोज्ज्वळें दिसों येती ॥ ३ ॥वाटे त्या मातेसी जावें राउळासी । घ्यावें दर्शनासी ईश्वराच्या ॥ ४ ॥करणें वाटे मनीं बहु दान-धर्म । वाटे तें सत्कर्म व्हावें गृहीं ॥ ५ ॥ईश्वराची कथा श्रवणीं परिसावी । वाचेसी ती गावी हरिकथा ॥ ६ ॥उत्तम लक्षणें सात्विक गुणांचीं । होती तिज साचीं डोहाळ्यांत ॥ ७ ॥तये वेळीं थोर अवतारी ते संत । योगी ज्ञानी वसत हुबळी क्षेत्रीं ॥ ८ ॥नामें सिद्धारूढ ओळखिती जन । चाले नामस्मरण अविरत ॥ ९ ॥शिवनामाचा तो होतसे गजर । जेणें पापें थोर जळूनी जाती ॥ १० ॥जन्मासि येईल स्वामी अवतार । म्हणुनी पुण्य थोर वाढविती ॥ ११ ॥पापाचे अंचळ फिटोनियां जावे । आणिक वाढावें पुण्य थोर ॥ १२ ॥शिवनामें हुबळी क्षेत्र तें भरोन । नाद सामावोन भरला नभीं ॥ १३ ॥दशदिशांलागीं गजर नामाचा । उच्चार शिवाचा घरोघरीं ॥ १४ ॥स्वामी सिद्धारूढ जाणोनी महत्त्व । शिवनाम तत्त्व विखुरताती ॥ १५ ॥ठायीं ठायीं शिवदर्शन घडावें । श्रवणीं पडावें शिवनाम ॥ १६ ॥ऐसे पावन झालें क्षेत्र हुबळीनगर । होणार अवतार म्हणोनियां ॥ १७ ॥कार्तिक तो मास अतीव सुखद । ऋतु तो शरद सुखकर ॥ १८ ॥धान्याची समृद्धी होत याच काळीं । आनंद-दिवाळी सकळिकां ॥ १९ ॥देव-प्रबोधाची झाली एकादशी । जागृती देवासी होय तेव्हां ॥ २० ॥वैकुंठचतुर्दशी पवित्र तो दिन । पाळिताती जन व्रत थोर ॥ २१ ॥करोनी उपवास हरिहर–भेटी । घेवोनियां होती आनंदित ॥ २२ ॥ऐसी चतुर्दशी गेली मावळोन । पौर्णिमा ते पूर्ण उदया आली ॥ २३ ॥त्रिपुरी पौर्णिमा हे मुख्य मानिती । त्रिपुर पाजळिती सायंकाळीं ॥ २४ ॥यथासांग पूजा करूनि त्रिपुराची । पाजळिती त्याची ज्योति मग ॥ २५ ॥त्रिपुरासुराचा वध तो करोनि । सुखी केले पूर्ण अमर हरें ॥ २६ ॥त्रिपुरांतक नाम भक्तीं दिलें त्यांस । पावोनि संतोष सकळांनीं ॥ २७ ॥ऐशा पौर्णिमेसी आली जन्मवेळ । साधाया सुवेळ सिद्ध काळ ॥ २८ ॥लक्ष्मीबाईसी प्रसूतीवेदना । होती त्या कीं जाणा तेच दिनीं ॥ २९ ॥सौम्यशा बुधवारीं मध्याह्नाचे प्रहरों । जन्मवेळ खरी साधियेली ॥ ३० ॥सोळा घटी आणि अधिक अर्ध घटी । वरीयान योगावरी असे जन्म ॥ ३१ ॥भरणी नक्षत्राचा चतुर्थ चरण । असे कुंभ लग्न राशी मेष ॥ ३२ ॥वृश्चिकेचा शुक्र दशम स्थानांत । गुरु भौम असत चतुर्थासी ॥ ३३ ॥तुळेचा तो रवि संगे बुध राहू । नवमस्थानीं वैभवे ऐसें असे ॥ ३४ ॥मेषेचा तो केतू असे तृतीयांत । पराक्रमीं वसत चंद्र तो कीं ॥ ३५ ॥ऐशा शुभ काळीं आणि शुभ वेळीं । प्रगटला वनमाळी भूलोकांत ॥ ३६ ॥सकलही अमर सूक्ष्मरूपें धरून । पातले येवोन तया स्थाना ॥ ३७ ॥दत्त अवधूत स्वामी समर्थांचा । अवतार साचा झाला जनीं ॥ ३८ ॥धरोनी नरदेह अवतरोनि आले । प्रकट जाहले अवनीवरीं ॥ ३९ ॥रामानंद सद्गुरु बीडकरांसाठीं । आले जगजेठी मृत्युलोकीं ॥ ४० ॥शिष्यासाठीं गुरु गुरुसाठीं शिष्य । ऐसा खेळ खास चालतसे ॥ ४१ ॥लक्ष्मीनारायणाचे पवित्र उद्रांत । स्वामी ते समर्थ जन्म घेती ॥ ४२ ॥पाहोनी बाळाची अतीव दिव्य कांती । उभयतां होती आनंदित ॥ ४३ ॥सकळ सोपस्कार करोनि बाळासी । नाम बालकासी ठेविताती ॥ ४४ ॥अनामा तो पूर्ण त्यासी देती नाम । अजन्म्यासि जन्म कल्पोनियां ॥ ४५ ॥द्वादश त्या दिनीं बांधोनि पालख । जमविले प्रमुख नरनारी ॥ ४६ ॥सुशोभित केला पालख तो फार । समारंभ थोर आरंभिला ॥ ४७ ॥मातेनें पालखीं ठेवोनि बालका । नाम सांगे देखा सव्य कर्णी ॥ ४८ ॥रामचंद्र ऐसें ठेवियेलें नाम । सुख तें परम पावोनिर्यां ॥ ४९ ॥दिस मास वाढे बाळ सुलक्षण । बाळलीला पूर्ण पाही माता ॥ ५० ॥उक्त काळीं केलें मौजीबंधनास । ब्रह्मउपदेश सांगे पिता ॥ ५१ ॥गायत्री मंत्राचा करूनी उपदेश । केलें संस्कारास व्रतबंधाचे ॥ ५२ ॥संध्या शिकवोन समग्र बाळासी । वामदेव लोमदेव नामासी ठेवियेलें ॥ ५३ ॥पांच वर्षेवेरी वाढले हुबळींत । कानडी शिकवीत त्यांसी तेव्हां ॥ ५४ ॥उपरी कुरूंदवाडीं आणि पुण्यामाजी । कोल्हापुरीं सहजीं शिकती गुरु ॥ ५५ ॥मराठी आणिक इंग्रजी भाषेचें । शिक्षण तें साचें घेती बाबा ॥ ५६ ॥पुढें अठराशें अठ्याण्णव सालीं । मुंबापुरींत झाली परीक्षा ती ॥ ५७ ॥झाले ते मॅट्रिक वसुनी बंधुगेहीं । विश्वविदयालर्थी जाती मग ॥ ५८ ॥विल्सन कॉलेजांत पुढें बाबा जात । तेथें उच्च घेत शिक्षणास ॥ ५९ ॥एकोणीसशें दोन सनांत पिताजी । निवर्तानि सहजीं गेले स्वर्गी ॥ ६० ॥वडील ते बंधू कृष्णराव यांनीं । पुण्यास आणोनि ठेवियेलें ॥ ६१ ॥इंजिनीअरिंग कॉलेजीं घालोन । दिधलेंसें ज्ञान उच्चतम ॥ ६२ ॥वसतां मुंबापुरींत बंधूचे गृहात । स्नेह यांचा होत भागवताशीं ॥ ६३ ॥वामन भागवतांपाशीं स्नेह झाला । त्यांनीं दावियेला मार्ग यांसी ॥ ६४ ॥भागवत होते शिष्य बीडकरांचे । त्यांनीं पत्र साचें दिधलें यांसी ॥ ६५ ॥एकोणीसशें सनीं पत्र देवोनियां । पाठविलें ठायीं महाराजांचे ॥ ६६ ॥रामानंद बीडकर महाराज । वंदोनियां काज कथियेलें ॥ ६७ ॥दावियेलें पत्र करोनि प्रणिपात । म्हणती माझें चित्त करा शांत ॥ ६८ ॥वदती रामानंद बाबांसी पाहीन । आलासि घेवोन पत्र तूं गा ॥ ६९ ॥स्नेही वामनाचा म्हणुनी केला उभा । परमार्थाचा गाभा इच्छिसी तूं ॥ ७० ॥कासया घेतलें इंग्रजी शिक्षण । तेणें सर्व घाण झाली असे ॥ ७१ ॥असो. एल्.सी.ई. तूं होई प्रथम आतां । पाहूं परमार्थीं पुढतीं मग ॥ ७२ ॥सदाशिव पेठेंत राहती पुण्यांत । भडभडे वाड्यांत रामचंद्र ॥ ७३ ॥चिमण्यागणपतीपाशीं गृह संपादोन् । जाती ते सुजाण कॉलेजांत ॥ ७४ ॥सन एकोणीसशें चार या सालांत । एल्.सी.ई. होत सद्गुरु बाबा ॥ ७५ ॥पुण्यांत असतां बीडकर-मठीं । बैसोनियां गोष्टी ऐकती हे ॥ ७६ ॥शेवटिचें वर्षी महाराजांचे पाशीं । बैसोनि सेवेसी करिते झाले ॥ ७७ ॥वाचिती न कांहीं लिहिती न काहीं । गुरुचरणाठायीं स्थिर झाले ॥ ७८ ॥येवोनि मठांत माता सांगे मात । अभ्यास न करित रामचंद्र ॥ ७९ ॥शेवटील वर्षी कैसा होईल पास । काळजी जिवास हेचि माझ्या ॥ ८० ॥रामानंदगुरु वदती माउलीसी । न करीं मानसीं चिंता तूं गे ॥ ८१ ॥तुझा रामचंद्र माझा असे जाण । करिन रक्षण तयाचें मी ॥ ८२ ॥होईल तो पास धरीं हा विश्वास । माझे वचनास सत्य मानीं ॥ ८३ ॥परिक्षा जाहली पुढें यथाकालीं । रामानंदें केली माव° तेव्हां ॥ ८४ ॥जाहले उत्तीर्ण रामचंद्र पूर्ण । केलें संपादन पदवीस ॥ ८५ ॥एल्.सी.ई. परीक्षा होवोनियां पास । गुरुवाक्य साच केलें त्यांहीं ॥ ८६ ॥प्रथम वंदोन मातेचे चरण । गुरुगृहीं जाण पातले ते ॥ ८७ ॥धरोनि चरण वंदिले मस्तकीं । रामानंदीं निकी निष्ठा त्यांची ॥ ८८ ॥मानसा लागलें सद्गुरुचें ध्यान । न सुचे तें आन° चिंता काहीं ॥ ८९ ॥माता निवर्तली स्वर्गीं निघूनी गेली । नुरला कोणी वाली गुरुवीण ॥ ९० ॥पुढें जुन्नरास राहिले जावोन । भगिनीगृहीं जाण सद्गुरुराज ॥ ९१ ॥धाकुले ते बंधू असती हरिभाऊ । तयांचाही ठाव बघती तेची ॥ ९२ ॥वारंवार येती पुण्यपत्तनास । गुरुगृहीं खास दर्शनासी ॥ ९३ ॥हुबळीसी असतां स्वामी सिद्धारूढ । देती यांसी गूढ शिवनाम ॥ ९४ ॥आणिक दिधली माळा तीही एक । वदले कौतुक करोनियां ॥ ९५ ॥तुझा नियत गुरु भेटतां तुजसी । वळखील माळेसी माझ्या कीं या ॥ ९६ ॥जो कीं आपेंआप ओळखील माळ । सद्गुरु केवळ तुझा तोची ॥ ९७ ॥तोंवरी करावें शिवनामस्मरण । जेणें जन्म-मरण दुरावत ॥ ९८ ॥सन एकोणीसशें सहा या सालांत । रामानंद बोधित रामचंद्र ॥ ९९ ॥मस्तकीं ठेवोनि अपुला सिद्ध कर । शक्तिपात थोर केला त्यांनीं ॥ १०० ॥समग्र स्वरूप दावोनी आपुलें । तत्त्वदर्शी केलें बाबांलागीं ॥ १०१ ॥कर्णीं करोनियां पेरणी बीजाची । नयनीं स्वरूपाची झळक देती ॥ १०२ ॥देवोनियां दिव्य दृष्टी रामचंद्रा । स्वानंदसागरा मेळविलें ॥ १०३ ॥रामानंदांचा तो अनुग्रह होतां । लावियेलें चित्ता तेंचि ध्यान ॥ १०४ ॥करोनि उड्डाण भेदिलें गगन । सहस्रारीं खूण न्याहाळिली ॥ १०५ ॥तेंपासोनियां देहांतापर्यंत । बाबा न च येत कदा खालीं ॥ १०६ ॥रामानंद बीडकर महाराजांनीं । सच्छिष्य हा ज्ञानी पूर्ण केला ॥ १०७ ॥करूनी परंमट स्वरूपीं बैसविलें । अपुल्यासम केलें बाबांलागीं ॥ १०८ ॥निराकारामाजीं नेवोनि घातिलें । चित्त ना परतलें तेथोनियां ॥ १०९ ॥अखंड रंगले स्वरूपाचे रंगीं । सद्गुरु बाबा जगीं धन्य धन्य ॥ ११० ॥सद्गुरु बाबांची कथिली जन्मकथा । शिक्षणाची अवस्था निरूपिली ॥ १११ ॥माता-पितरें तेवीं बंधू आणि भगिनी । यांचे निरूपणीं कथन केलें ॥ ११२ ॥सद्गुरुभेटीचा कथिला वृत्तांत । अनुग्रहकथा यांत निरूपिली ॥ ११३ ॥दास म्हणे संक्षिप्त सद्गुरुचरित्रीं । पूर्ती झाली खरी तृतीयाध्याया ॥ ११४ ॥येथून ऐका