संक्षिप्त सद्गुरू चरित्रअध्याय ४१०:०३सद्गुरुचरणां करोनि वंदना । आरंभितो जाणा निरूपण ॥ १ ॥तोचि वदविता तोचि लिहेविता । कर्ता करविता अवघा तोचि ॥ २ ॥तयाचे सत्तेनें खेळे विश्व सारें । अवघीं स्थिरचरें नटोनियां ॥ ३ ॥प्रकृती पुरुष अनादी हे दोन्ही । सांख्य तत्वज्ञांनीं निर्णोयो हा ॥ ४ ॥प्रकृती पुरुष नाहींच तीं दोन । अद्वैत हें पूर्ण सत्य असे ॥ ५ ॥द्वैत अद्वैताचे पैल श्रीसद्गुरू । स्वानंद सागरू अनिर्वाच्य ॥ ६ ॥तो कीं करुणाकरू शांतीचा उदधी । जया ठायीं आधी व्याधी नाहीं ॥ ७ ॥केवळ आनंदू भरला परमानंदू । शब्देंवीण संवादू होय जेथ ॥ ८ ॥ज्याची भेटी होता मावळतो शब्द । केवळ आनंद निजबोधू ॥ ९ ॥त्याचे पदीं जीव जातांचि शरण । त्रिताप ते पूर्ण निवारिती ॥ १० ॥तोचि श्रीसद्गुरू भक्तजनांसाठीं । प्रगटला जगतीं रामचंद्र ॥ ११ ॥कथा त्याची आतां पुढें अवधारा । चित्ता स्थिर करा परिपूर्ण ॥ १२ ॥सन एकोणीसशें आठ या सालात । सद्गुरू बाबा वसत जुन्नरासी ॥ १३ ॥वॉटर-सप्लाय आणि सॅनिटरी खातें । यांत नोकरी ते करिते झाले ॥ १४ ॥एकोणीसशें नऊ सालीं सुरवातीस । सोडिली नोकरीस बाबांनी कीं ॥ १५ ॥पुनरपि एकोणीसशें नऊ या सालात । नोकरी स्वीकारीत सद्गुरू बाबा ॥ १६ ॥पी.डब्ल्यू.डी. माजीं झाले ओव्हरसिअर । रावसाहेब थोर वदती लोक ॥ १७ ॥त्या काळीं वदती ओव्हरसिअरासी । रावसाहेब नामेंसी सकळ जन ॥ १८ ॥रत्नागिरी नगरीं गेलीं वर्षे दोन । ओव्हरसिअर म्हणून होते तेव्हां ॥ १९ ॥उपरी नागोठण्यास झाली बदली ती गा । सुपरवायझर जागा मिळोनियां ॥ २० ॥त्याचे आधीं झाला असे अनुग्रह पूर्ण । हरपलें भान व्यवहाराचें ॥ २१ ॥सद्गुरू रामानंद पदला सगळा भार । रक्षाया सर्वत्र निजशिष्या ॥ २२ ॥रावसाहेब बाबांचा विवाह तो झाला । एकोणीसशें दहा साला ऐसें जाणा ॥ २३ ॥यांचे गुरुराज बीडकर महाराज । विवाहाचें काज करिती तेची ॥ २४ ॥विष्णुपंत बोडस जुन्नर ग्रामींचे । स्नेही बीडकरांचे होते जाणा ॥ २५ ॥कुलशीलवान असती ते पूर्ण । त्यांची कन्या सुजाण दुर्गाताई ॥ २६ ॥योजियेली वधू रामचंद्रपंतां । रामानंदें शिष्य-हिता जाणोनियां ॥ २७ ॥ऑनररी मॅजिस्ट्रेट होते विष्णुपंत । होते ते प्रख्यात जुन्नर प्रांतीं ॥ २८ ॥रामचंद्र उत्तम जाणोनियां वर । योजिला सत्वर स्वकन्येसी ॥ २९ ॥विवाह-सोहळा जाहलासे थोर । निजकन्याकर दिधला हातीं ॥ ३० ॥रामानंद बीडकर लक्ष घालोनियां । देती शिष्यवर्या उत्तम भार्या ॥ ३१ ॥सद्गुरु बाबांचे लक्ष नाहीं त्यांत । सदा स्वरूपस्थित राहताती ॥ ३२ ॥रावसाहेबांची बदली जाहली । रत्नागिरीस केली नेमणूक ॥ ३३ ॥कोठें पाठवावें निजशिष्या आतां । हीचि एक चिंता रामानंदां ॥ ३४ ॥करिती तपास सकळिकांपाशीं । कोण रत्नागिरीसी अपुला असे ॥ ३५ ॥तंव विष्णुपंत बोडस सांगती । रत्नागिरीप्रती स्नेही माझे ॥ ३६ ॥हरिपंत जोशी वकिल सज्जन । प्रख्यात ते पूर्ण त्या प्रांतांत ॥ ३७ ॥स्वपुत्रासमान रक्षितील यासी । माझे जामातासी, चिंता नको ॥ ३८ ॥रामानंद गुरूंनी मानोनो वचन । आज्ञापिलें जाण बाबांलागीं ॥ ३९ ॥जाउनी रत्नागिरीस करावी नोकरी । हरिपंतांचे घरीं राहोनिंया ॥ ४० ॥असती ते थोर सच्छील सज्जन । तुज संरक्षण ठेवितील ॥ ४१ ॥सद्गुरु रामचंद्र रत्नागिरीस आले । आणि स्वीकारिलें नोकरीसी ॥ ४२ ॥ओव्हरसिअर म्हणुनी होती ती नोकरी । राहुनी जोशांघरीं स्थिर झाले ॥ ४३ ॥दोन वर्षे तेथ करोनि नोकरी । तेथोनि सत्वरीं बदली झाली ॥ ४४ ॥पेण शहरांत जागा स्वीकारित । लिमयांचे वाड्यांत सद्गुरु बाबा ॥ ४५ ॥लिमये वकील होते बाबांचे गुरुबंधू । ऐसा हा संबंध जुळूनी आला ॥ ४६ ॥मिठाचे व्यापारी लिमये जे पेणेंत । वर्गबंधू शाळेत बाबांचे ते ॥ ४७ ॥तीन वर्षे झाला पेण शहरीं वास । सद्गुरु बाबांस नोकरीसाठीं ॥ ४८ ॥सुपरवायझराची असे यांची जागा । गृहिंची सर्व निगा राखी पत्नी ॥ ४९ ॥पत्नीचें तें नांव ठेवियेले सीता । गृहसाम्राज्यांत सांभाळी ती ॥ ५० ॥पुनरपि नागोठण्यास आले बदलोन । सदा ज्यांसी ध्यान स्वरूपाचें ॥ ५१ ॥नागोठणें पेण येथोनियां येती । बीडकर मठाप्रती दर्शनासी ॥ ५२ ॥आठवड्याची एक खेप न चुकविती । सद्गुरुचरणीं प्रीती ऐसी यांची ॥ ५३ ॥पेणेहूनि येती सायकलीवरोन । छत्तीस मैल पूर्ण 'पळसदरिसी' ॥ ५४ ॥तिथुनी आगगाडीनें येती ते पुण्यास । परतुनि पेणेस जाती तैसे ॥ ५५ ॥नागोठण्याहून महाडासी आले । एस्.डी.ओ. जाहले सद्गुरु बाबा ॥ ५६ ॥शेखीं महाडांतून झालें प्रमोशन । बाबांसी तें जाण पनवेलीस ॥ ५७ ॥पी.डब्ल्यु.डी. माजी असिस्टंट इंजिनीअर । रावसाहेब थोर होते तेव्हां ॥ ५८ ॥पनवेल नगरींत वसती वर्षे दोन । बिऱ्हाड करून सद्गुरुराज ॥ ५९ ॥सन एकोणीसशें एकोणीस सालीं । अखेरीस झाली बदली यांची ॥ ६० ॥बाबा मुंबापुरिस आले बदलोन । वांद्र्यासिस घेवोन बिऱ्हाड तें ॥ ६१ ॥असिस्टंट इंजिनीअर याच जाण्यावरी । नोकरी मुंबापुरीमाजी करिती ॥ ६२ ॥सुपरिटेंडिंग इंजिनीअर नार्दर्न सर्कलचे । पी.ए. होते त्यांचे सद्गुरु बाबा ॥ ६३ ॥सन एकोणीसशें तेवीस सालांत । आर्किटेक्ट ऑफिसांत बदली झाली ॥ ६४ ॥गव्हर्नमेंटचा असिस्टंट आर्किटेक्ट । पी.ए. झाले तेथ सद्गुरु बाबा ॥ ६५ ॥नोकरी करितां, लक्ष स्वरूपांत । अर्ज त्यावारि करित सेवक-गण ॥ ६६ ॥परी तपासणी होतांचि बाबांची । कामें प्रथम प्रतिचीं आढळती ॥ ६७ ॥अश्नावरूनी येती ऑफिसांत बाबा । गर्दीचा तो तोबा टाळावया ॥ ६८ ॥सद्गुरु रामानंद त्यांचे पाठिराखे । तयांवरी कोपे कोण जगीं ॥ ६९ ॥ज्ञानेश्वर वदती स्वयें अभंगांत । सद्गुरु-महिमा येथ सांगतों तो ॥ ७० ॥“सद्गुरुसारिखा असतां पाठिराखा । इतरांचा लेखा कोण करी” ॥ ७१ ॥सद्गुरु बाबांचे बाबतींत खरें । वचन पटलें कीं रे ज्ञानेशांचें ॥ ७२ ॥खडीचे ते त्रास उडोनियां गेले । म्हणुनी अर्ज केले कारकुनांनीं ॥ ७३ ॥अर्जावर सही फसवोनि घेतलि । वरिष्ठांसि केली सादर ती ॥ ७४ ॥वरिष्ठ जाणती बाबांचा महिमा । अर्जाचिये कामा योजियेलें ॥ ७५ ॥वरिष्ठ ते गेले खडी-तपासास । घेवोनि कारकुनास सांगतीं त्या ॥ ७६ ॥तंव जैसे तैसे त्रास जाण्यावरी । उणें अधिक तिळभरी नसे कांही ॥ ७७ ॥तेंव्हा खोटेपणा कळला कारकुनांचा । रोष वरिष्ठांचा झाला त्यांसी ॥ ७८ ॥तंव सद्गुरु बाबा बोलती वचन । करुनी निवारण त्या रोषांचें ॥ ७९ ॥नका करूं आतां शिक्षा काहीं यासी । क्षमा सेवकासी करा आतां ॥ ८० ॥अपकारी यांसी करुनी उपकार । तारिला सत्वर कारकून ॥ ८१ ॥सद्गुरु रावसाहेब बाबा पूर्ण संत । अवतार निश्चित स्वामींचा ते ॥ ८२ ॥रामानंद गुरूंनी त्यांचा सर्व भार । स्वशिरावर उचलिला ॥ ८३ ॥असा हा वृत्तांत घडला पनवेलीस । रक्षिलें बाबांस बीडकरांनीं ॥ ८४ ॥फोर्ट विभागांत करिती नोकरीस । पी. डब्ल्यु. डी. सेक्रेटरीएट कचेरीस म्हणताती ॥ ८५ ॥रांगणेकर यांचे वाडींत राहती । रांगणेकरवाड्याप्रती वस्ती करुनी ॥ ८६ ॥बहुत पाहुणे येती सदनासी । आदरातिथ्यासी करिती त्यांच्या ॥ ८७ ॥धान्यें गृह सारें असे भरलेलें । न्यून न दिसलें कवणां कांहीं ॥ ८८ ॥नित्य शनिवारी भजन यांचे घरीं । जमुनी भक्त भारी होत असे ॥ ८९ ॥स्वयं भजनांत रंगोनियां जाती । देहभानप्रती विसरोनी ॥ ९० ॥स्वरूपानुसंधान चाले अविरत । वैखरी वदत रामनाम ॥ ९१ ॥आपुलाले विषय सांडोनि इंद्रियें । एके ठायीं स्वयं आली सारीं ॥ ९२ ॥मन बुद्धि चित्त अहंतेंसहित । आले ऐक्याप्रत स्वरूपध्यानीं ॥ ९३ ॥बाबांपाशीं मुरली दिवस आणि राती । अखंड ती ज्योती प्रगटली ॥ ९४ ॥‘मत माउली'चे जावोनियां स्थानीं । ध्यानांत रंगोनी बसती बाबा ॥ ९५ ॥हातीं धरोनियां चिरूट तो एक । पेटवोनि देख ठेविती तो ॥ ९६ ॥एकदां ओढोन रंगताति ध्यानीं । चिरूट जळोनि जात असे ॥ ९७ ॥शेखीं जळोनियां येतांच बोटांत । बोटें जळती तेथ बाबांचीं तीं ॥ ९८ ॥तें सांडोनियां देती तो चिरूट । परतोनि येत निज गेहा ॥ ९९ ॥काम संपवोनि घरीं परतातां । भिकारी भेटतां प्रतिदिनीं ॥ १०० ॥नित्य त्या भिकाऱ्या देती एक नाणें । आपुले करानें सद्गुरु बाबा ॥ १०१ ॥तोच तो भिकारी नित्य भेटे त्यांसी । चालविलें क्रमासी बहु काळ ॥ १०२ ॥एकदां कचेरींत पहिले तारखेस । पगार झाला खास बाबांचा तो ॥ १०३ ॥गृहासि जातांना नित्याचा भिकारी । सर्व पगार करीं दिधला त्याचे ॥ १०४ ॥घरीं येतां पाहती पगार खिशांत । दुर्गामाईप्रत नुमगे तो ॥ १०५ ॥पुसतां सांगती दान भिकाऱ्यास । झालें आज खास पगाराचें ॥ १०६ ॥तैं दुर्गाताई जाती ओकांपासी । यांचे कचेरीसी, तेही जात ॥ १०७ ॥सकळ प्रकार ओकांसी कथून । सांगितला पूर्ण माउलीने ॥ १०८ ॥तेव्हां ओक यांनीं येतां ऑफिसांत । कथिला वृत्तांत सकळांसी ॥ १०९ ॥कळतां वृत्तांत ऑफिसरापाशीं । आज्ञापी सकळांसी स्वयं तो कीं ॥ ११० ॥पगाराची सही घेवोनि बाबांची । रक्कम पगाराची गृहीं धाडा ॥ १११ ॥तैंपासनियां पगार घेवोन । शिपाई आणोन घरीं देत ॥ ११२ ॥बाबा विसरले देह गेह वित्त । जडलें त्यांचे चित्त स्वरूपांत ॥ ११३ ॥दास म्हणे संक्षिप्त सद्गुरुचरित्रीं । झाली पूर्ती बरी चतुर्थाध्याया ॥ ११४ ॥येथून ऐका