संक्षिप्त सद्गुरू चरित्रअध्याय ५११:३८नमो सद्गुरुराया भक्तकैवारिया । तव कृपे माया विलया जाई ॥ १ ॥सत्य आत्मज्ञान देसी निज बाळां । लावोनियां लळा स्वरूपाठायीं ॥ २ ॥विषयांचा छंद तुटोनिया जात । तव कृपा होत जेव्हां जीवा ॥ ३ ॥अपार ते भक्ती उपजे अंतरीं । वैराग्याची थोरी कळोनियां ॥ ४ ॥विवेक-अंकुर लागतो वाढीस । नित्यानित्य खास उमजों लागे ॥ ५ ॥संसाराचा पाश तुटोनियां जात । आवडी उपजत हरिचे भजनीं ॥ ६ ॥हरि-नाम घ्यावें हरि-गुण गावे । ऐसें जीवेंभावें वाटो लागे ॥ ७ ॥लागतसे जीवा एकांताची गोडी । साधनीं आवडी उपजे भारी ॥ ८ ॥तव कृपेचा हा अगाध महिमा । कळावया आम्हां नसे ज्ञान ॥ ९ ॥आम्हां अज्ञ जीवा ताराया कारण । नरदेह घेवोन प्रकट होसी ॥ १० ॥ऐसे जे सद्गुरु रामचंद्र बाबा । ज्यांचा चाले ताबा मायेवरी ॥ ११ ॥त्यांची कथा आतां करूं या श्रवण । एकाग्र हें मन करोनियां ॥ १२ ॥वांद्र्यासी राहतां ऑफिसांत जाती । वेळ न चुकविती कदापी ते ॥ १३ ॥वक्तशीरपणें जाती कचेरीत । परी दिनरात असती ध्यानीं ॥ १४ ॥देह हिंडतसे आपुलिये परी । भासे वरीवरी ऐसें जनां ॥ १५ ॥परी मानस तें होवोनी उन्मन । सदा चाले ध्यान आत्म्याचें ॥ १६ ॥कचेरीत जातां घेवोनी कागद । रामराम शब्द लिहिताती ॥ १७ ॥ऐसा कितिक वेळ जाय तो निघोन । बघुनि बहुत जन पिसा म्हणती ॥ १८ ॥आणिक मत्सर करोनि बाबांचा । करिती नालस्तीचा प्रयत्न ते ॥ १९ ॥कोणी एकें केला अर्ज वरिष्ठांस । द्यावयासी त्रास बाबांसी तो ॥ २० ॥आर्.ए.सहस्रबुद्धे येती ऑफिसांत । उशिरां हें सत्य प्रतिदिनीं ॥ २१ ॥काम न करिती रामराम लिहिती । वेड्यासम वर्तती कचेरीत ॥ २२ ॥साहेबांनीं याचा करावा तपास । तेणें अमुचा त्रास चुकेल कीं ॥ २३ ॥ऐसे चार दोन अर्ज ते कीं झाले । पावसाचे आले दिवस तेव्हां ॥ २४ ॥वर्षाकाळीं बहुत वृष्टी असे होत । त्या कीं मुंबापुरींत बहु वेळां ॥ २५ ॥पाणी तें सांचोनी रस्ते जलमय होती । गाड्या न धावती रेल्वेच्या त्या ॥ २६ ॥येती ऐसे दिन पांच सात खास । त्या मुंबापुरीस पावसाळीं ॥ २७ ॥एक वेळ झाली अपार ती वृष्टी । झालें जीवन कष्टी मुंबापुरीचें ॥ २८ ॥गल्ल्या–बोळांतूनी रस्तोरस्तीं पाणी । वाहतें भरुनी अपरंपार ॥ २९ ॥तया दिनीं कोणी जात न कचेरींत । घरोघरीं स्वस्थ बसले तेव्हां ॥ ३० ॥परी सद्गुरु बाबा करीती नवल । साधोनियां वेळ कचेरीची ॥ ३१ ॥उपस्थित झाले वेळीं कचेरींत । भिजुनी पर्जन्यांत गेले तरी ॥ ३२ ॥सर्व वस्त्रें झालीं ओलीं शरिरावरचीं । परी रावसाहेबांची खचली न वृत्ती ॥ ३३ ॥आले कचेरींत आपले खोलींत । वस्त्रें तीं वाळत घातलीं कीं ॥ ३४ ॥ओलेचि धोतर नेसोनियां तेंव्हा । काम जिवाभावापासुनि करिती ॥ ३५ ॥कचेरींत फक्त हजर शिपाई । आणि नाईकही हजर असे ॥ ३६ ॥त्यांनी हा पाहिला बाबांचा प्रकार । आश्चर्य तें थोर वाटे त्यांना ॥ ३७ ॥कैसे वांद्र्याहून आले हे साहेब । पर्जन्याची बाब आडवी न यां ॥ ३८ ॥इतुक्यात आले अकरा ते वाजत । प्रमुख साहेब येत कचेरीसी ॥ ३९ ॥पर्जन्याचें मान ठावें असे त्यांसी । कोणी न कचेरीसी आले आज ॥ ४० ॥पुसे युरोपिअन वरिष्ठ साहेब । नाईकासी बाब तये वेळीं ॥ ४१ ॥म्हणे आज कोणी आले का रे येथ । काम कचेरींत करावया ॥ ४२ ॥नाईक बोलतो वचन तयांसी । अवघ्या कचेरीसी शुकशुकाट ॥ ४३ ॥फक्त सहस्रबुद्धे साहेब एक आले । आहेत बैसले कचेरींत ॥ ४४ ॥तेंव्हा तो साहेब आला पाहायास । भेटला बाबांस त्यांचे स्थानीं ॥ ४५ ॥नेसोनियां ओलें धोतर बैसती । काम करिताती निवांतची ॥ ४६ ॥पुसे तो साहेब रावसाहेबांसी । तुम्हीं कचेरीसी कैसे आलां ॥ ४७ ॥थोर हा पर्जन्य वर्षतो बाहेरी । वांद्र्याहूनि स्वारी कैसी आली ॥ ४८ ॥बाबा बोलताती येतों घोड्यावरून । कधीं न चुकवीन कचेरी मी ॥ ४९ ॥सरकारी वेतन घेताँ महिन्यास । काम करायास हवें मज ॥ ५० ॥फुकट पगार कैसा तो मी घ्यावा । आवडेल देवा कैसें हैं कीं ॥ ५१ ॥वेळेवरी यावें वेळेवरी जावें । कर्तव्य करावें आपुलें तें ॥ ५२ ॥हेचि देवपूजा देवा प्रिय फार । निज कर्म पार पाडण्याची ॥ ५३ ॥चार दोन वेळां साहेबानें ऐशा । करोनी तपासा पडताळिलें ॥ ५४ ॥तव कळों आलें तयासी तें सत्य । वक्तशीर नित्य असती बाबा ॥ ५५ ॥मग लिहिता झाला शेरा पुस्तकांत । वक्तशीर येत सहस्रबुद्धे ॥ ५६ ॥कोणीही न द्यावें लक्ष तक्रारीस । कसल्याही अर्जास यांचेवरील ॥ ५७ ॥कोणी न पाहिला ऐसा वक्तशीर । साहेब समग्र कचेरींत ॥ ५८ ॥आणि तो उत्तम लिहोनिय़ां शेरा । अभिनंदन खरा करिता झाला ॥ ५९ ॥मग सेक्रेटरी तोचि युरोपिअन । म्हणे पडताळोन पाहों आतां ॥ ६० ॥काम न करिती काही ऑफिसात । तक्रार लिखित यांचेवरी ॥ ६१ ॥तीन इमारतींचें काम पूर्ण झालें । तपास् यां भलें अवचित ॥ ६२ ॥अवचित जावोन करितां तपासणी । कळेल करणी खरी यांची ॥ ६३ ॥ठीक साडेदहा वाजतांच आला । साहेब तो भला वरिष्ठ गा ॥ ६४ ॥वदे करण्या आलों काम-तपासणी । चला तुम्ही झणीं सर्व माझ्या ॥ ६५ ॥तीन इमारती पुऱ्या ज्या कीं झाल्या । तपास् सगळ्या प्रथम त्याची ॥ ६६ ॥पायापासोनियां शेवटपर्यंत । मापें घ्या समस्त बरोबरी ॥ ६७ ॥सद्गुरू बाबांनीं काय तेव्हां केलें । ऐकावें सगळें वृत्त तें कीं ॥ ६८ ॥पायापासोनियां शेवटपर्यंत । सर्वही मापें देत लिहोनिय़ां ॥ ६९ ॥घेवोनी कागद पहिल्या इमारतीचीं । मापें लिहिलीं साचीं स्वहस्तानें ॥ ७० ॥दारें खिडक्या आणि कोनाकोपऱ्यांचीं । इत्थंभूत साचीं लिहिलीं ॥ ७१ ॥साहेबाचे हातीं कागद देवोन । घ्यावीं तपासोन म्हणती मापें ॥ ७२ ॥माणसें घेवोन तपासिलीं मापें । ठायीं ठायीं मापें जैशीं तैशीं ॥ ७३ ॥कोठें नाहीं रेसभरी तेही चूक । पाहोनी कौतुक वाटे मनीं ॥ ७४ ॥मग दुसऱ्या, तिसऱ्या मापें इमारतींचीं । सांगे लिहिलीं साचीं दाखवावी ॥ ७५ ॥घेवोनियां कोरा कागद हातांत । मापें लिहितात सद्गुरू बाबा ॥ ७६ ॥दुसऱ्या आणि तिसऱ्या दोन्ही इमारती । मापें कागदाप्रती मांडियेलीं ॥ ७७ ॥देवोनी कागद वरिष्ठांचे हातीं । मोजावें सांप्रती आतां तुम्ही ॥ ७८ ॥वरिष्ठ साहेब बसुनी खुर्चीवरी । कौतुक तें करीं अंतरांत ॥ ७९ ॥पुनरपि घेवोन कामगार लोक । मानोनी हरिख जाती तेव्हां ॥ ८० ॥जावोनियां दोन्ही पाही इमारती । शास्त्रोक्त त्या रीतीं तपासोनी ॥ ८१ ॥रेसमात्रा नाहीं चूक ती मापांत । जैसें लिहिलें तेथ तैसें असे ॥ ८२ ॥पाहोनियां सारें जाहला चकित । चमत्कार येथ ऐसा कायी ॥ ८३ ॥कैसी स्मरणशक्ति अतुल ही यांची । पद्धत कामाची अतर्क्यची ॥ ८४ ॥काम केल्यावीण कैसे पडेल ठावें । माप यां आघवें इमारतींचें ॥ ८५ ॥कामामाजीं बहु असती हे हुषार । काय वर्णू फार बुद्धी यांची ॥ ८६ ॥स्मरणशक्ति थोर असे यांच्यापाशीं । न चुकविती कामासी कचेरीचे ॥ ८७ ॥प्रत्यक्ष देखिलें वरिष्ठानें तेंव्हा । शेरा तो लिहावा म्हणे आतां ॥ ८८ ॥आर्.ए. सहस्त्रबुद्धे हुषार ऑफिसर । गैर कारभार नाहीं त्यांचा ॥ ८९ ॥दक्ष निज कार्यां सतत राहोनी । करिती काम पूर्ण कचेरीचें ॥ ९० ॥यांचेविरुद्ध जरी कोणी अर्ज केला । न मानावें त्याला कवणेंही ॥ ९१ ॥अर्ज तो टाकावा फाईल करोना । ऐसें हें लिहोन ठेवियेलें ॥ ९२ ॥मग पाचारोन कनिष्ठ कारकुनां । समज दिली त्यांना बहुतचि ॥ ९३ ॥आतां याचे पुढती सहस्त्रबुद्ध्यांसी । त्रास देती त्यासी दंडीन मी ॥ ९४ ॥धरा बोल ध्यानीं सावध व्हा मनीं । कुत्सित वृत्ती झणीं सोडा आतां ॥ ९५ ॥अंदाजे एकोणीसशें पंचवीस सव्वीस सालीं । बाबांसी ती आली उन्मनिस्थिती ॥ ९६ ॥नाहीं निद्रा त्यांसी कांहीं न बोलती । बैसोनी राहती एके स्थळीं ॥ ९७ ॥संसारीचें लक्ष उडालें संपूर्ण । अखंडीत ध्यान आत्मरूपीं ॥ ९८ ॥नसे देहभान नसे तें बोलणें । आज्ञाचक्र-पेणें उल्लंघिलें ॥ ९९ ॥प्रणवाच्या मात्रा एकत्र त्या होती । आणि मिसळती एकेठायीं ॥ १०० ॥अर्धमात्रेमाजीं सारें झालें लीन । तळें उलंडोन अमृत स्रवे ॥ १०१ ॥बिंदूमाजीं सारें गेलें सामावोन । बिंदुले फोडोन पैल गेले ॥ १०२ ॥शेखीं सहस्रदळीं जाहलें मीलन । गेलें मी-तूंपण हारपोनी ॥ १०३ ॥मी तूं ऐक्या आलें दुजेपण गेलें । विश्व धवळले ब्रह्मानंदें ॥ १०४ ॥प्रकृती-पुरुष निमाला पसारा । देहभाव खरा मावळला ॥ १०५ ॥देहींच असोन जाहले विदेही । वृत्ती ब्रह्माठायीं लीन झाली ॥ १०६ ॥शब्दातीत स्थिती अनुभवासी पर । गेला नारीनर भेदभाव ॥ १०७ ॥अवघ्या ठायीं देव दिसे नयनास । जाहले उदास देहधर्मी ॥ १०८ ॥ऐसें सामरस्य होवोनियां ठेलें । संपूर्ण विरालें बाह्य भान ॥ १०९ ॥उन्मनी अवस्था तेवीं बालभाव । जाहले वैभव प्राप्त त्यांसी ॥ ११० ॥परी हैं नमुजे संसारी जनांस । ज्यांचे आशापाश गळले नाहीं ॥ १११ ॥जना सत्य वाटे काम आणि अर्थ । म्हणोनी अनर्थ मांडिताती ॥ ११२ ॥ऑफिसांत तेव्हां घडे विपरीत । काम नच होत यांचे हातीं ॥ ११३ ॥स्वस्थ बैसोनियां राहती हे उगे । वाटे तें वाउगें सकळिकां ॥ ११४ ॥तें काय झालें तो सारा वृत्तांत । पुढिले अध्यायांत वर्णू आतां ॥ ११५ ॥दास म्हणे संक्षिप्त सद्गुरु चरित्रीं । पूर्ती झाली बरी पंचमाध्याया ॥ ११६ ॥येथून ऐका