संक्षिप्त सद्गुरू चरित्रअध्याय ६१०:०५जयजयकार तुमचा असो सद्गुरूराया । जीवां बोधोनियां करा स्थिर ॥ १ ॥तुम्ही चतुर बहु बोध करण्यांत । पहातसां हित बालकांचें ॥ २ ॥त्वरें करोनियां सद्विद्येचा बोध । अज्ञान अशुद्ध नाशीतसां ॥ ३ ॥परे पैल जीवां तुम्ही रमवितां । आणिक दावितां मोक्ष-पंथ ॥ ४ ॥संसार-तमाचा करोनियां नाश । चैतन्य-सूर्यास भेटवितां ॥ ५ ॥तुम्ही अनुपम सामर्थ्याने युक्त । जिवासी जें उक्त तेंची देतां ॥ ६ ॥चतुर्थ अवस्थेमधील जें ज्ञान । देवोनी पालन करितां त्यांचें ॥ ७ ॥भक्तीच्या काननीं चंदन हो तुम्ही । पूजा करण्या आम्ही, तुम्ही देवो ॥ ८ ॥कल्याण-रत्नांची तुम्ही रत्नखाण । कैवल्यनिधान पाववितां ॥ ९ ॥ब्रह्मानुभवाचे तुम्ही चक्रवर्ती । तुम्ही स्वयंज्योति परब्रह्म ॥ १० ॥ऐशा सद्गुरुनाथा तुमचे चरणीं माथा । ठेवितसे आतां निवांतची ॥ ११ ॥कृपा करोनियां वाढवावें चरित्र । जेणें जीवमात्र पावन होती ॥ १२ ॥ते श्रीसद्गुरुबाबा होवोनी उन्मन । धरोनियां मौन स्थिरावले ॥ १३ ॥बाबांच्या गृहिणी नामें दुर्गाताई । विस्मय त्यांसी होई प्राप्त तेंव्हा ॥ १४ ॥कळेना तयांसी काय तें करावें । कैसें सांभाळावें तयांलागीं ॥ १५ ॥गोंधळोन गेल्या सुचे न त्यां कांही । पाहोनी स्थिती ही भांबावल्या ॥ १६ ॥म्हणती जादूटोणा केला कोणी यांसी । लाविलें वेडासी यांसी कोणी ॥ १७ ॥काय हे विपरित जाहली करणी । देवाजीचे मनीं काय आलें ॥ १८ ॥बाबा काय करिती ऐकावी ती स्थिती । जेवती न खाती लहरीवीण ॥ १९ ॥कोणी जवळी येतां त्याचे पायां पडती । मानोन त्याप्रती देव ऐसें ॥ २० ॥कोणी म्हणती वेडे भ्रमिष्ट म्हणती कोणी । नच ते जाणोनि स्थिती यांची ॥ २१ ॥लक्ष न घालिती संसारी म्हणून । देती वेडेपण जन यांसी ॥ २२ ॥असुनी पगार मोठा रावसाहेब म्हणती । परी हे पायां पडती सकळांचे ॥ २३ ॥अणुरेणूमाजी पाहोनी भगवंत । क्षणोक्षणीं होत नम्र तेथें ॥ २४ ॥अहंकारनाश करावा म्हणोन । वंदनभक्ति पूर्ण स्विकारली ॥ २५ ॥मध्यंतरी काय झाली असे गोठी' । संतती नसे पोटीं यांसी कांहीं ॥ २६ ॥लोक–आग्रहास्तव जाऊनी त्र्यंबक क्षेत्रीं । नाग–नारायण बळी केला यांनीं ॥ २७ ॥यथासांग केला सकल विधी पूर्ण । आले परतोन स्वगृहासी ॥ २८ ॥नाहीं झाला सुत परी कन्या झाली । संतती मिळाली यांजलागीं ॥ २९ ॥नाम शकुंतला ठेविलें तिजसी । 'चिमणी' या नामेंसी पाचारिती ॥ ३० ॥सुलक्षणी कन्या देवानें दिधली । दुर्गाताई झाली माता तेव्हां ॥ ३१ ॥अंदाजे एकोणीसशें चोवीस पंचविसांत । कन्या जन्मा येत सद्गृहूहीं ॥ ३२ ॥दिसेंदीस झाली वाढोनियां थोर । लग्नाचा विचार होईल पुढती ॥ ३३ ॥दुर्गाताईकडे सारे संबंधित । वेडेच म्हणत बाबांसी ते ॥ ३४ ॥जाहले भ्रमिष्ट लागोनियां वेड । आतां कैंची तड संसाराची ॥ ३५ ॥आमुच्या मुलीचें जाहलें वाटोळें । बीडकरांनीं केलें वेडे यांसी ॥ ३६ ॥बीडकर महाराजांना देती शिव्याशाप । संबंधी अमूप दोघांचेही ॥ ३७ ॥नारायणराव बोडस विचार करिती । दवाखान्याप्रती न्यावयाचा ॥ ३८ ॥डॉक्टर–वैद्यांचे करितां उपचार । न शमे विकार तिळभरी ॥ ३९ ॥डॉक्टर–वैद्य म्हणती रोग नाहीं कांहीं । उपयोग न होई औषधांचा ॥ ४० ॥नारायणराव होते मेव्हणे बाबांचे । बंधू दुर्गाताईंचे हितकर्ते ॥ ४१ ॥विचार तो पक्का ठरवोनि त्यांनीं । येरवड्याचे स्थानीं न्यावयाचा ॥ ४२ ॥मेंटल हॉस्पिटललांत बाबांसी ते नेती । घेवोनी संमती भगिनीची ॥ ४३ ॥तेथील डॉक्टरां केलें निवेदन । वेडाचें तें पूर्ण बोडसांनीं ॥ ४४ ॥मेंटल हॉस्पिटलांत ठेवोनि बाबांसी । परतले गृहासी बोडस ते ॥ ४५ ॥तेथील वरिष्ठ डॉक्टर तपासिती । सकळही रीती योजोनियां ॥ ४६ ॥शेवटीं ठरविले वरिष्ठांनीं तेव्हां । रोग तो नसावा कांहीं यांसी ॥ ४७ ॥देहींच्या त्या क्रिया सर्व व्यवस्थित । यांच्या चालतात रात्रंदिन ॥ ४८ ॥कुणा शिवीगाळ हे न करिती कांहीं । मारामारी तेही करिती ना ॥ ४९ ॥विचारिलें कांहीं तर उत्तर देती । उत्तरें असती चतुरत्वाचीं ॥ ५० ॥अती बुद्धिमान बोलती भाषण । यांसी असे ज्ञान अलौकिक ॥ ५१ ॥एके ठायीं बसुनी राहती म्हणून । वेडे यांसी कोण म्हणेल कीं ॥ ५२ ॥नाहीं अपस्मार नाहीं बुद्धीभ्रंश । नाहीं लवलेश वेडाचा तो ॥ ५३ ॥नोकरींत लक्ष न देती म्हणून । वेडे यांसी जन म्हणताती ॥ ५४ ॥संसारीं विरक्त जाहले हे फार । न करिती विचार ऐहिकाचा ॥ ५५ ॥म्हणुनी संबंधित म्हणती वेडे यांसी । लक्षोनी स्वार्थासी आपुलीये ॥ ५६ ॥त्यांचा स्वार्थ न साधे म्हणुनी म्हणती वेडा । तत्त्वज्ञानी गाढा असे हा कीं ॥ ५७ ॥यांचा नसे त्रास इतर कवणां । असे बसुनी स्थाना आपुलिये ॥ ५८ ॥इतर वेड्यांचेपासोनि अलिप्त । ठेविलें बाबांप्रत डॉक्टरांनीं ॥ ५९ ॥सुज्ञ ते डॉक्टर समजले मनीं । योग्यता जाणोनी बाबांची ती ॥ ६० ॥दिव्य तेज कांती दिसे मुखावरी । मुद्रा ते खेचरी स्वीकारली ॥ ६१ ॥दृष्टी अर्धोन्मिलित नित्य अंतर्मुख । भोगिताती सुख स्वरूपाचें ॥ ६२ ॥ऐशा स्थितीत गेलें एक वर्ष तेथ । मेंटल हॉस्पिटलांत बाबांचे तें ॥ ६३ ॥मग वासुअण्णा बाबांचे गुरुबंधू । बीडकर-मठीं संबंधू असे ज्यांचा ॥ ६४ ॥बीडकर मठाचे हेडट्रस्टी ते कीं । करिती योजना निकी बाबांसाठीं ॥ ६५ ॥वासुअण्णा भागवत आणि सबजज्ज गुप्ते । झाले योजिते ते उपायांसी ॥ ६६ ॥पटवोनी समजूत त्या दुर्गाताईंची । करविती बाबांची सुटका तेव्हां ॥ ६७ ॥आणिक दोन तीन स्नेही मदतीस । होते त्यांचे खास तयें वेळीं ॥ ६८ ॥देवोनियां हमी मनोरुग्णालयांत । आणिलें गृहप्रत बाबांलागीं ॥ ६९ ॥वासुअण्णा जाणती थोरवी बाबांची । न ये सर त्यांची आणिक कोणा ॥ ७० ॥पुनरपि हजर जाहले ऑफिसांत । परी नाहीं तेथ लक्ष त्यांचें ॥ ७१ ॥कांहीं रजा घेणं कांहीं हजर होणें । ऐसेंचि वागणें होत असे ॥ ७२ ॥ऐसें चालतांना क्लेश होती फार । पाठीशीं संसार असेचि तो ॥ ७३ ॥पुढें ठरविलें पेन्शन तें घ्यावें । इन्व्हॅलिड व्हावें म्हणोनियां ॥ ७४ ॥सन एकोणीसशें अठ्ठावीस सालांत । बाबा ते भेटत सेक्रेटरीसी ॥ ७५ ॥आणिक आपल्या साहेबां भेटोन । दोघांसी वंदन केलें त्यांनीं ॥ ७६ ॥सेक्रेटरी होता तो कीं युरोपिअन । पुसे तें कारण रजेचें कीं ॥ ७७ ॥बाबा सांगताती विचार मीं केला । पेन्शन घेण्याला सिद्ध झालों ॥ ७८ ॥अखेरचा नमस्कार वरिष्ठ साहेबांसी । तेवीं निज ऑफिसरासी करिती बाबा ॥ ७९ ॥म्हणती आतां जातों पेन्शनींत आम्ही । लक्ष अमुचे कामीं असू द्यावें ॥ ८० ॥रजा होवोनियां मंजूर बाबांची । झाली विश्रांतीची तरतूद ॥ ८१ ॥इन्व्हॅलिड पेन्शनचा अर्ज त्यांनीं केला । अर्ज तो पोंचला कचेरींत ॥ ८२ ॥वरिष्ठ डॉक्टरांनीं केली तपासणी । इन्व्हॅलिड म्हणोनी दिधला शेरा ॥ ८३ ॥डॉक्टरी रिपोर्ट गेला ऑफिसांत । मान्य तो करीत सेक्रेटरी ॥ ८४ ॥प्रमुख वरिष्ठ पी.डब्लयू.डी.चा । करी मान्य त्यांचा रिपोर्ट तो ॥ ८५ ॥वरिष्ठ युरोपिअनसाहेब सेक्रेटरी । अर्ज तो स्विकारी बाबांचा कीं ॥ ८६ ॥त्याचीही नोकरी संपवोन तोही । जाणार स्वगेहीं युरोपांत ॥ ८७ ॥आठ दहा दिवस उरली मुदत त्याची । जावया स्वदेशीं परतोनी ॥ ८८ ॥परी सद्गुरु बाबा स्वयं अवतारी । महती त्यांची भारी असे थोर ॥ ८९ ॥तयांचे पाठीशीं उभे बीडकर । सदा सद्गुरुवर रामानंद ॥ ९० ॥त्यांचिये कृपेनें साहेबांचे मनीं । आलें तेव्हां झणीं करणें कार्य ॥ ९१ ॥सर्व्हिस बुक आणि जरूर ते सारें । कागद केले त्वरें गोळा त्यानें ॥ ९२ ॥इन्व्हॅलिड ठरवोन लिहिला रिपोर्ट । अनुकूल बाबांप्रत जो कीं फार ॥ ९३ ॥समस्त जमवोन कागद जरूरीचे । पेन्शन-पेपरांचें काम केलें ॥ ९४ ॥आर्. ए. सहस्रबुद्धे रावसाहेबांसी । द्यावें पेन्शनासी इन्व्हॅलिड ॥ ९५ ॥म्हणोनियां शेरा स्वहस्तें मारोन । केस केली पूर्ण सेक्रेटरीनें ॥ ९६ ॥शिक्कामोर्तब सही करोनि आपुली । केस पाठविली ए. जी. कडे ॥ ९७ ॥अकौंटंट-जनरलासी भेटे सेक्रेटरी । जावोनी सत्वरीं जातीनें तो ॥ ९८ ॥सहस्रबुद्धे यांचें ठरवोनि पेन्शन । सँक्शन करोन झणीं द्यावें ॥ ९९ ॥ऐशी हे विनंती करोनी तयासी । पेन्शन सँक्शनासी करविलें ॥ १०० ॥संपूर्ण कागद सही शिक्क्यासहित । ए.जी. कडूनी घेत साहेब तो ॥ १०१ ॥पी.डब्ल्यु.डी. सेक्रेटरीएट ऑफिसांत । स्वयं तो आणीत कागद सारे ॥ १०२ ॥स्वहस्तें भरोनी सर्वही कागद । पाठवोनि देत बाबांकडे ॥ १०३ ॥कागद पाठवोन, देवोनि पेन्शन । झाला युरोपियन स्वस्थचित्त ॥ १०४ ॥पेन्शन बसले रुपये चौऱ्यांऐशीं । सद्गुरु बाबांसी सरकारांत ॥ १०५ ॥महागाई सहा रुपये एक आणा । म्हणोनि बाबांना मिळे मग ॥ १०६ ॥घेवोनि पेन्शन सेवामुक्त झाले । मनीं आनंदले सद्गुरु बाबा ॥ १०७ ॥सद्गुरु बाबांकडे धाडोनि कागद । साहेब झाला सिद्ध जावयासी ॥ १०८ ॥संपवोनि नोकरी बसला बोटीवरी । एक दोन दिनाउपरी साहेब तो ॥ १०९ ॥गेला तो साहेब परतुनी युरोपांत । पेन्शन बाबांप्रत देवोनियां ॥ ११० ॥सद्गुरु बाबांची नोकरी संपली । वांद्रयाची सोडिली जागा मग ॥ १११ ॥आले परतोनि पुण्यासि ते तेव्हां । गुरुगृहीं बांधवां भेटायासी ॥ ११२ ॥भिड्यांचे वाड्यांत बीडकर मठाजवळी । बिऱ्हाड ते काळीं मांडियेलें ॥ ११३ ॥पुढें सद्गुरु बाबा कैसे ते वर्तले । जाईल कथिलें सप्तमाध्यायीं ॥ ११४ ॥दास म्हणे संक्षिप्त सद्गुरुचरित्रीं । षष्ठाध्याया झाली पूर्तता ही ॥ ११५ ॥येथून ऐका