संक्षिप्त सद्गुरू चरित्रअध्याय ७१७:०७सकल विद्यांचे जें कीं आश्रयस्थान । आत्मरूप पूर्ण स्वयंभू तें ॥ १ ॥त्याच गणेशाचें करोनि स्मरण । तेचि सद्गुरुचरण-स्मरण असे ॥ २ ॥ज्यांचिये स्मरणें अवघी शब्दसृष्टी । येई निरवधी हातासी ती ॥ ३ ॥शब्दमात्र सारें होवोनि अंकित । मनिंचें स्फुरण होत साकार तें ॥ ४ ॥स्पष्ट सुयोग्य ते शब्द उमटती । होय अभिव्यक्ति विचारांसी ॥ ५ ॥ज्याच्या चरण-स्मरणें मुख्य सरस्वती । वैसे जिव्हेवरती येवोनियां ॥ ६ ॥वक्तृत्व तें होत गोड सर्वांलागीं । वक्तृत्वाचे अंगीं गोडी चढे ॥ ७ ॥ज्यांचिये स्मरणें स्थिरावें तें मन । आणि अंतःकरण स्थिरावतें ॥ ८ ॥मार्मिकपणा तो बाणोनि वाचेसी । होत श्रोतयांसी प्रिय शब्द ॥ ९ ॥सद्गुरुचरण हृदयीं स्थिर धरितां । ज्ञाना वैभव येतां वेळू न लगे ॥ १० ॥ऐसे जे परम पवित्र विमल । प्रभायुक्त कोमल सद्गुरुचरण ॥ ११ ॥तया सद्गुरुचरणीं नमोनि आदरें । विनवीं प्रेमभरें साहा व्हावें ॥ १२ ॥आपुली हे कथा मुखें बोलवावी । भक्तासी सुखवी ऐसी बापा ॥ १३ ॥परिसोनी वचन द्रवले ते चित्तीं । वासुदेवानंतसरस्वती सद्गुरु बाबा ॥ १४ ॥भिड्यांचे वाड्यात वरुषें होतीं तीन । जागा ती सोडोन दिधलीसे ॥ १५ ॥नारायणपेठेंत धुमाळ वाड्याप्रत । राहावया येत नंतर ते ॥ १६ ॥एकोणीसशें तीस एकतीस सालांत । धुमाळ वाड्यांत आले बाबा ॥ १७ ॥पहिले मजल्यावरी येवोनी राहिले । शेवटवेरी झाले स्थिर तेथें ॥ १८ ॥पहिल्या मजल्याची बहुतेक जागा । होती भाड्यानें गा बाबांकडे ॥ १९ ॥फक्त राजगुरु नामक ब्राह्मण । राहिले व्यापोन खोल्या दोन ॥ २० ॥सर्व दुर्गाताई बाबांची मंडळी । कन्या ती राहिली चिमणाबाई ॥ २१ ॥दुर्गाताई सारा करिती संसारा । आणि व्यवहार पाहती सर्व ॥ २२ ॥कन्या ती सद्गुणी हांसे खेळे तेव्हां । बालकस्वभावा अनुसरोनी ॥ २३ ॥तये काळीं बाबा असती ध्यानमग्न । खोलींत बैसोन राहाती एका ॥ २४ ॥अखंड ते ध्यान चाले स्वरूपाचें । नाहीं तें जगाचें भान कांहीं ॥ २५ ॥मनीं येतां जाती मठांत उठोन । घ्यावया दर्शन समाधीचें ॥ २६ ॥सदा ऊर्ध्व दृष्टी असे झांकोळली । खिन्न न दिसली मुद्रा कधीं ॥ २७ ॥सान थोर कोणी बीडकर-मठांतील । दिसतां त्याच वेळ नमिताती ॥ २८ ॥मठांचा पाणक्या भेटतां रस्त्यांत । त्यासी दंडवत करिती तेथ ॥ २९ ॥सान थोर कोणी मठींचें भेटतां । उल्हास तो चित्ता होय त्यांचे ॥ ३० ॥उचंबळुनी चित्तीं, धरोनियां पाय । नमिती सद्गुरुमाय म्हणोनियां ॥ ३१ ॥ठायीं ठायीं त्यांसी दिसे आत्माराम । गेले धर्माधर्म निरसोनी ॥ ३२ ॥सद्गुरु-स्वरूपीं बघती भूतजात । सहजीं वर्तत उन्मनींत ॥ ३३ ॥जावा अहंकारू अवघाचि जळोन । म्हणुनि भक्ती वंदन स्विकारिली ॥ ३४ ॥वंदनभक्तीनें मान अपमान । जाती ते जिरोन आपेंआप ॥ ३५ ॥नमितां भूतामात्रीं गळे अहंकार । नुरे सान-थोर ऐसा भावो ॥ ३६ ॥धुरेचा' हा असे भक्तियोगू साचा । असे भगवंताचा निर्णयो हा ॥ ३७ ॥सानपण घेतां जाई द्वैत सारें । निजानंदीं खरें रमतां येत ॥ ३८ ॥वंदनभक्ति योगू दिसे हा कीं सान । परी हें साधन अती मोठें ॥ ३९ ॥भक्तीवीण नोहे साध्य हा कीं योगू । गुरुकृपें मार्ग सांपडे हा ॥ ४० ॥बीडकरमठीं जातांच बाबानीं । करणें रस्त्यामधुनी वंदनास ॥ ४१ ॥प्रथम पायरीस देखतां नयनीं । नमस्कार झणीं करिती तेथ ॥ ४२ ॥सकल पायऱ्या नमिलिया वरी । प्रवेशती भीतरीं मठामार्जी ॥ ४३ ॥बीडकर महाराजांचें बसावयाचें स्थानीं । जाउनी लोटांगणीं लोळती ते ॥ ४४ ॥तेथोनी समाधी-कलशस्थानीं जाती । नाक तोंड घाशिती धरूनी कान ॥ ४५ ॥करूनी नमस्कार करिती विनवणी । नयनीं धरोनी सद्गुरुरूप ॥ ४६ ॥पुढें पलंगापाशीं जावोनी वंदन । वारंवार जाण करिती बाबा ॥ ४७ ॥मला द्यावें ज्ञान मला द्यावी भक्ती । स्वरूपीं राहण्या युक्ती सांगावी गा ॥ ४८ ॥अनाथाची माझी राखा आतां लाज । निवारवा माज अहंतेचा ॥ ४९ ॥स्वरूपापासोनी एक निमिषभरी । लक्ष न होईल दुरी ऐसें करा ॥ ५० ॥तुम्ही हो सद्गुरु स्वामी रामानंद । द्या मजसी आनंद अविनाशी ॥ ५१ ॥नको मज कीर्ती नको तो कीं अर्थ । चुकवावा अनर्थ संसारींचा ॥ ५२ ॥ठेवा अविरत तुमचे चरणापाशीं । नका भवपाशीं गुंतवूं आतां ॥ ५३ ॥क्षणोक्षणीं मग समाधीचे पुढें । रडावें तें कोडें करोनियां ॥ ५४ ॥पुन्हां पुन्हां तेथ टेकोनी मस्तक । प्रार्थिताती एक सद्गुरुराज ॥ ५५ ॥सेवा घ्या करुन माझे हातीं आतां । नका लोटूं ताता मजसी दूर ॥ ५६ ॥रडावें हांसावें आनंदें नाचावें । सद्गुरु तुमच्यासवें सर्वकाळ ॥ ५७ ॥ऐका विनवणी घेवोनियां कानीं । मज दीना जनीं तारावें कीं ॥ ५८ ॥सद्गुरु बाबा मग उठती तेथोन । जाती राउळीं स्थान लक्षोनियां ॥ ५९ ॥शिवालयद्वारीं साष्टांग नमोनी । मस्तक घासोनी करिती ध्यान ॥ ६० ॥काष्ठमय मूर्ती विठ्ठल-रखुमाईच्या । सजीव त्या साच्या दिसती त्यांसी ॥ ६१ ॥करुनी नमस्कार त्यांचिये चरणांसी । प्रार्थिती तयासी सर्वभावें ॥ ६२ ॥आईसाहेबांसी तुम्ही सांभाळिलें । तेवीं मज वहिलें सांभाळावें ॥ ६३ ॥स्वयंभू गणपती असे त्या स्थानांत । तया प्रणिपात करिती बाबा ॥ ६४ ॥कारुणिक असे हनुमंत मठांत । स्वयंभू जो होत मूळांतची ॥ ६५ ॥तयांसी वंदोन करिती प्रार्थना । मारुतिराया ज्ञाना देई मज ॥ ६६ ॥सद्गुरु रामानंद तुम्हां उपासिती । हनुमंत-कवच करिती पाठ नित्य ॥ ६७ ॥उग्र तप त्यांचे देखोनि बलभीमा । केलें त्यांचे कामा रामदूता ॥ ६८ ॥करितां अनुष्ठान घेवोनियां ध्यास । केलें प्रतिज्ञेस पूर्ण तुम्हीं ॥ ६९ ॥सद्गुरु रामानंदी सेवा करितां ऐशी । देसी दृष्टांतासी तयांलागीं ॥ ७० ॥देवोनी दृष्टांत पुरविला हेत । ऐसा वायुसुत प्रेमळ तूं ॥ ७१ ॥अक्कलकोटीं जावें स्वामिदर्शन घ्यावें । तुवां प्रेमभावें निरोपिलें ॥ ७२ ॥अक्कलकोट स्वामी सद्गुरूंचा शोध । देउनी रामानंद तोषविले ॥ ७३ ॥मायलेकरांची करविली भेटी । संसारासी तुटी पाडावया ॥ ७४ ॥तो तूं अंजनीसुत होवोनी प्रसन्न । माझें संरक्षण करीं आतां ॥ ७५ ॥ऐशी ऐशी ते कीं करोनी प्रार्थना । घालिती लोटांगणा वारंवार ॥ ७६ ॥भोळा शिवसांब जो कीं उमावर । तया वारंवार वंदिताती ॥ ७७ ॥तया मृडानीवरा हिमनगजामात । स्तविती एकाग्रचित्ता करोनियां ॥ ७८ ॥प्रार्थितीं शिवासी नयनीं लोटे नीर । स्वर सद्गद फार होवोनियां ॥ ७९ ॥जोडोनिंया हात करिती दंडवत । ललाट टेकीत भूमीवरी ॥ ८० ॥म्हणती भवांतका भवभयहारका । येईं त्रिपुरान्तका धांवोनियां ॥ ८१ ॥रामनामबीज तूंची जाणतोस । भक्त तूंची खास एकमेव ॥ ८२ ॥सद्गक्ती पाहीन होसी तूं प्रसन्न । देसी वरदान निज भक्तां ॥ ८३ ॥न मागें मी कांहीं गुरुभक्तीवीण । द्यावें वरदान हेंचि मज ॥ ८४ ॥माझी सद्गुरुभक्ती होवो दृढतर । आन तो विचार मनीं न यावा ॥ ८५ ॥ऐसें वारंवार नमोनिंयां तेथ । प्रदक्षिणा करित शिवालयीं ॥ ८६ ॥चंद्र सूर्य यांसी देखोनि नयनीं । तयांसी प्रार्थोनी निघती पुढें ॥ ८७ ॥औदुंबरापाशीं येवोनी थांबती । आणिक करिती नमस्कार ॥ ८८ ॥पाकशाळेमाजी जावोनिंयां येती । अन्नपूर्णा वंदिती तये स्थानीं ॥ ८९ ॥वासुअण्णा भागवत तेव्हां हेडट्रस्टी । बीडकर मठीं असती तये वेळीं ॥ ९० ॥त्यांची पत्नी सुत मठींच राहती । बीडकरांप्रती सेवोनियां ॥ ९१ ॥बाबा मग येती पुढील भागांत । वासुअण्णा बसत जये स्थानीं ॥ ९२ ॥महाराजांचे स्थानीं हेडट्रस्टीलागीं । बघती स्वरूपरंगीं रंगोनियां ॥ ९३ ॥तयांचे चरण धरोनी वंदिती । आणिक प्रार्थिती वारंवार ॥ ९४ ॥म्हणती कृपा करा सांभाळा लेंकुरा । मायिकाचा वारा सारा दुरी ॥ ९५ ॥सांगा महाराजांसी मज रक्षायासी । कराया कृपेसी विनवा तुम्ही ॥ ९६ ॥दूर नका ठेवूं मज लेकुरातें । ऐसें सद्गदचित्तें प्रार्थिताती ॥ ९७ ॥प्रसाद महाराजांचा द्या हो मज आतां । तेणें शांती चित्ता येईल गा ॥ ९८ ॥नका पाहूं अंत व्हावें कृपावंत । ऐसें ऐसें वदत प्रेमभरें ॥ ९९ ॥मठींच्या सकल वंदिती नरनारी । मस्तक पायांवरी ठेवोनिंयां ॥ १०० ॥मठींचे मांजरूं देखतां नयनीं । त्याचेही चरणीं लागताती ॥ १०१ ॥गवळी दूधवाला अथवा मोलकरीण । त्यासी करिती जाण नमस्कार ॥ १०२ ॥जे जे जीव कोणी बीडकर मठांत । तयां तयां वंदित सर्वत्रांसी ॥ १०३ ॥बैसोनियां मग समाधीचे पुढें । नयनीं रूप उघडें धरोनियां ॥ १०४ ॥लागे ती समाधी नसे भान कांहीं । काळवेळ नाहीं शुद्धी तेव्हां ॥ १०५ ॥मग परतोनी स्वगृहासी जाती । जावोनी बैसती स्वानंदांत ॥ १०६ ॥वासुअण्णा भागवत शिष्य बीडकरांचे । ध्यान योगी त्यांचे लक्ष थोर ॥ १०७ ॥तेही अधिकारी होते परमार्थांत । बाबांसी मानीत ते कीं फार ॥ १०८ ॥कडक स्वभाव दक्ष व्यवहारीं । मठ–कारभारी लक्ष देती ॥ १०९ ॥यांनी तन मन धन आपुलें तें सारें । बीडकरचरणीं कीं रें अर्पियेलें ॥ ११० ॥पंचवीस तीस सहस्त्र रुपयांचा हिस्सा । अर्पियेला खासा रामानंदी ॥ १११ ॥निस्पृह ते थोर आणि स्पष्टवक्ते । बघती व्यवस्थेतें बीडकर–मठीं ॥ ११२ ॥यांची पत्नी प्रेमळ मायाळू ती भारी । मठीं सेवा करी सकळिकांची ॥ ११३ ॥ऐशा कीं त्या काळीं तीनही त्रिकाळ । दर्शनां केवळ बाबा येती ॥ ११४ ॥तीन वेळां दर्शन करोनियां जावें । इतर काळीं राहावें स्वस्थ गृहीं ॥ ११५ ॥चिपळ्या आणि करीं घेऊनी एकतारी । भजन करिती भारी बाबा तेव्हां ॥ ११६ ॥तासन्तास राहावें रंगोनी भजनांत । ना तरी समाधिस्थ स्वरूप ध्यानीं ॥ ११७ ॥अंगीं ज्वर असतां डिग्री पांच पांच । पत्ता नसे यांस त्याचा कांहीं ॥ ११८ ॥बसुनी गादीवरी टेकोनि तक्कयास । लक्षिती स्वरूपास सर्वकाळ ॥ ११९ ॥कधीं कधीं जाती ओंकारेश्वरासी । घेती दर्शनासी शंकराचे ॥ १२० ॥कधीं लहर ती लागतां बाबांची । उपासना सूर्याची करिती ते ॥ १२१ ॥सूर्योदयापासोनी सूर्यास्तापर्यंत । एकाग्र लावीत लक्ष बिंबीं ॥ १२२ ॥दृष्टी नच चळे उष्णतेचेयोगें । ध्यान न तें भंगे तीव्रतापें ॥ १२३ ॥राहोनि उभे लक्षिती भानूसी । सूर्यमंडलासी भेदावया ॥ १२४ ॥भेद केला त्यांनीं सूर्यमंडलाचा । चैतन्य–भानूचा उदय झाला ॥ १२५ ॥तेथ ना उदय नाहीं तेथ अस्त । सहस्त्र भानू जेथ उदय झाले ॥ १२६ ॥अनंत अपार तेजाचा सागर । शीतल तो फार चंद्रासम ॥ १२७ ॥पौर्णिमेचा चंद्र धरोनियां लक्षीं । लक्षिती अलक्षीं सद्गुरु बाबा ॥ १२८ ॥लौकिक चंद्रासी असे वृद्धी क्षय । तेथें चंद्र होय अक्षय तो ॥ १२९ ॥शीतल प्रकाशु ताप क्षयावीण । असे तें साधन अलौकिक ॥ १३० ॥चंद्र सूर्य जेथ होत मिसळणी । लाविती त्या स्थानीं लक्ष बाबा ॥ १३१ ॥खेचरी गोचरी आणि अगोचरी । मुद्रा परात्परीं लावियेली ॥ १३२ ॥चौवीस मुद्रांचे पैल निघुनी गेले । परब्रह्मीं मीनलें असुनी देहीं ॥ १३३ ॥जनक राजानें जो योग साधिला । तोचि आचरिला बाबांनींही ॥ १३४ ॥स्वरूप-सांप्रदायी विहंगम-मार्ग । अष्टांग राजयोग पूर्ण झाला ॥ १३५ ॥मनाचा हा योग नोहे हठयोग । लक्षीं घ्या हें चांग भाविकांहीं ॥ १३६ ॥भगवान ते कृष्ण बोलले गीतेंत । चतुर्थ अध्यायांत अर्जुनासी ॥ १३७ ॥हा योगु धुरेचा कथिला मीं साचा । सूर्यालागीं ऐसा जाण पार्था ॥ १३८ ॥सूर्ये विवस्वता सांगितला योग । विवस्वतें चांग आचरिला ॥ १३९ ॥वैवस्वतें मग आपुले पुत्रासी । कथिला इक्ष्वाकूसी योग हाची ॥ १४० ॥तेथोनो पुढती चाले परंपरा । राजर्षी आचारा करिती याच्या ॥ १४१ ॥परी त्या योगाचा पुढें लोपू झाला । म्हणोनि कथिला तुजसी आतां ॥ १४२ ॥ऐसा हा मानवा योगु हितकारी । आतां तूं आचरीं कुंतीसुता ॥ १४३ ॥करीं हा संसार धरोनियां धीर । स्वधर्म आचार नच सांडीं ॥ १४४ ॥असतां संसारांत करावा हा योगु । ऐसा कथाभागु श्रीहरि वदे ॥ १४५ ॥स्वरूप-सांप्रदायी हाचि मुख्य योगू । राजयोग मार्ग जाणावा कीं ॥ १४६ ॥प्रभु रामचंद्रा वसिष्ठ ऋषींनीं । दावीयेला ज्ञाणीं आचरोनी ॥ १४७ ॥अंतरंगीं त्याग बाहेरी तो संग । परी तूं निःसंग राहीं पूर्ण ॥ १४८ ॥अवधूत-पंथी सरस्वती-शाखेंत । संप्रदाय वसत स्वरूपाचा ॥ १४९ ॥नृसिंह सरस्वती अक्कलकोट स्वामी । रामानंदीं नामीं उपदेशिती ॥ १५० ॥देवोनी थप्पड दिधलें योगसार । ध्यानीं परात्पर भेटवीला ॥ १५१ ॥शक्तिपातयोगें लाविली समाधी । हरियेली आधी व्याधी त्यांची ॥ १५२ ॥आणि बीडकरां दिधला अधिकार । चालवाया थोर योगु हाची ॥ १५३ ॥बीडकर महाराज चालविती त्यासी । कळाया जीवांन्सी संप्रदाय ॥ १५४ ॥स्वरूप-संप्रदाय श्रीराम दैवत । जानकी शक्ति येथ असे साची ॥ १५५ ॥हनुमंत-उपासना लावा सकळ जनां । पावाया निर्वाणा परब्रह्मीं ॥ १५६ ॥ऐशा ऐशा रीतीं उपासना होत । विदेहावस्थेंत वर्तताती ॥ १५७ ॥मुकुंदराव मोघे, गर्दे काशिनाथपंत । गुरुबंधू होत बाबांचे हे ॥ १५८ ॥शिवरामपंत खांडेकर आणि । भिडे ते कीं थोर बापुसाहेब ॥ १५९ ॥डॉक्टर निरोखेकर जे कीं दत्तोपंत । गुरुबंधू होत बाबांचे कीं ॥ १६० ॥श्रीमती बापट बाई त्या मठांत । गुरुभगिनी करित सद्गुरू-सेवा ॥ १६१ ॥नाना बापटांसी कृपा बीडकरांची । म्हणुनी हेडट्रस्टीची मिळे जागा ॥ १६२ ॥त्यांनीं लिहिलेले चरित्र बीडकरांचे । परि तें अच्युत मामांचे मुळांतील ॥ १६३ ॥पानवलकर अच्युतमामा अधिकारी । काय त्यांची थोरी वर्णावी ती ॥ १६४ ॥बाबांचे ते असती ज्येष्ठ गुरुबंधू । प्रेमाचा संबंध उभयांचा ॥ १६५ ॥अण्णासाहेब गुप्ते आजी विद्यमान । पुण्यामाजी जाण वसती हे ॥ १६६ ॥देशपांडे दामुअण्णा बाबांचे गुरुबंधू । तुटला यांचा संबंध इहलोकींचा ॥ १६७ ॥राजाभाऊ भिडे वसती कल्याणांत । विद्यमान असत आज ते कीं ॥ १६८ ॥ज्ञात व अज्ञात गुरुबंधू बाबांचे । असती किती कैसे देव जाणे ॥ १६९ ॥वरी जे कथिले ते ते बहुतेक । देखियेले देख डोळियांनीं ॥ १७० ॥अच्युतमामा मात्र न देखिले डोळां । परि आला पडताळा सद्गुरुकृपे ॥ १७१ ॥रावसाहेब सद्गुरू वसतां पुण्यांत । कथिला वृत्तांत सुरुवातीचा ॥ १७२ ॥उपासनामार्ग किंचित् विशद केला । गुरुबंधू नाममाला निवेदिली ॥ १७३ ॥संप्रदाय आणि योगाचा विचार । कथिला थोडा फार कळायासी ॥ १७४ ॥दास म्हणे संक्षिप्त सद्गुरूचरित्रीं । सप्तमाध्याया बरी पूर्ती झाली ॥ १७५ ॥येथून ऐका