संक्षिप्त सद्गुरू चरित्रअध्याय ८१०:३६असे जो सद्गुरु सच्चिदानंदघन । विमलबोधू ज्ञानदाता जो कीं ॥ १ ॥जयजय परमानंदू सद्गुरु तो थोर । जीवा–शिवापर पुरुषोत्तमु ॥ २ ॥माया–ब्रह्म यांच्या पैल जो कीं वसे । सद्गुरुस्वरूप कैसें बोलूं शब्द ॥ ३ ॥शब्दा जें कानडें* दिक्कालातीत । जेथें नित्यानित्य आटुनि जाय ॥ ४ ॥जयासी उपमा नसे जगीं कांहीं । अनुपम्य पाहीं सद्गुरुरूप ॥ ५ ॥एक वेळां दिठीं पडुनी होतां भेटी । हरपे अवघी सृष्टी मायिक ही ॥ ६ ॥अनुभवाविरहित असे नित्य स्थित । हृर्दी जें वसत सर्वकाळ ॥ ७ ॥तया श्रीसद्गुरु–स्वरूपी गजानना । करितों वंदना आत्मभावें ॥ ८ ॥रावसाहेब बाबा तेचि कीं सद्गुरु । धरुनि सगुण आकारू आले जगीं ॥ ९ ॥बीडकर महाराजांचे कार्य उर्वरीत । पूर्ण करण्या येथ प्रगटले ॥ १० ॥एकोणीसशें तेरा सालीं एप्रिल मासीं । एक तारखेसी विपरीत घडले ॥ ११ ॥बीडकर महाराजांनी त्यजुनी पार्थिवासी । संपविलें यात्रेसी इहलोकींच्या ॥ १२ ॥त्यजोनियां देह ब्रह्मीं लीन झाले । तेव्हां हरपलें सगुण रूप ॥ १३ ॥बाबा नव्हते जवळी त्यांचे अंतकाळीं । नंतर हे कळली वार्ता त्यांसी ॥ १४ ॥वार्ता कळों येतां घेवोनी रजेस । पातले पुण्यास सद्गुरु बाबा ॥ १५ ॥मांडियेला शोक अद्भुत बाबांनीं । एकचि धरुनी ध्यानीं सद्गुरुरूप ॥ १६ ॥अन्नपाणी वर्ज्य करोनि राहिले । अस्वस्थ ते झाले चित्तीं तेव्हां ॥ १७ ॥और्ध्वदेहिकाचें कार्य झाल्यावर । बाबा नोकरीवरी हजर झाले ॥ १८ ॥बीडकर महाराजांनी शांत केलें त्यांसी । ते वार्ता कवणासी न बोलती ॥ १९ ॥बाबांलागीं पूर्ण केलें बीडकरांनीं । स्वयं असतां जनीं देहामाजी ॥ २० ॥रामानंद महाराज निवर्तल्यावरी । बसविती गादीवरी बहुतुल्यांसी ॥ २१ ॥अण्णा बहुतुले शिष्य बीडकरांचे । अधिकारी गादीचे झाले मग ॥ २२ ॥सद्गुरूंचे स्थानीं बाबा मानिति त्यांना । करोनि वंदना सर्वकाळ ॥ २३ ॥बहुतुले महाराज होते गादीवरी । द्वादश वर्षेवेरी मठामार्जी ॥ २४ ॥द्वादश वर्षांउपरी पावले पंचत्व । झालें आत्मतत्त्व ब्रह्मीं लीन ॥ २५ ॥त्यांनीं ट्रस्ट केला बीडकर मठाचा । कारभार साचा चालवाया ॥ २६ ॥बीडकर महाराज झाले समाधिस्थ । वद्य त्या पक्षांत फाल्गुनांत ॥ २७ ॥साधीयेली दशमी भौमवार' साचा । मार्ग निर्वाणाचा धरोनियां ॥ २८ ॥द्वादशवर्षांउपरी अण्णा बहुतुल्यांनीं । फाल्गुनमासीं झणीं त्यजिला देह ॥ २९ ॥वद्य ते दशमी तेचि साधीयेली । वेळा ही साधिली गुरूचीच ॥ ३० ॥बहुतुले असती अधिकारी फार । करिती कारभार मठाचा तो ॥ ३१ ॥तयांचे नंतर ट्रस्टी वासुअण्णा । व्यवस्था ती जाणा पाहताती ॥ ३२ ॥बीडकर महाराजांच्या पत्नी जानकीबाई । शोभल्या त्या आईसम मठीं ॥ ३३ ॥त्यांना सकळ शिष्य आईच म्हणती । त्याही प्रीती करिती मातेसम ॥ ३४ ॥बाबांवरी त्यांची असे माया भारी । असतां मठाभीतरी रक्षति प्रेमें ॥ ३५ ॥गुरुपत्नीची ती बाबा सेवा करिती । तन मन धन खर्चिती त्यांचेसाठी ॥ ३६ ॥महाराज बोलतां कडक बाबांस । कैवार त्यांचा खास घेती आई ॥ ३७ ॥बाबांच्या विवाहसमयीं आई होत्या । उपस्थित स्थळीं त्या विवाहाचे ॥ ३८ ॥दुर्गाताई आणि बाबांसी लाधले । आशीर्वाद भले आईचे ते ॥ ३९ ॥पत्नी बीडकरांच्या जानकीबाई गेल्या । त्यजोनी देहाला श्रावणमासीं ॥ ४० ॥एकोणीसशें अकरा सालीं सोमवारीं । प्रयाणा साधिली वेळ त्यांनीं ॥ ४१ ॥त्याही वेळीं बाबा नव्हते कीं जवळी । पत्रांतोनि कळली वार्ता त्यांसी ॥ ४२ ॥अतीव तें दुःख जाहलें बाबांसी । परी दूरदेशीं असती तेव्हां ॥ ४३ ॥घेवोनी रजेसी पातले पुण्यासी । देण्या तिलांजलीसी दहावे दिवशीं ॥ ४४ ॥और्ध्वदेहिक केलें अण्णा बहुतुल्यांनीं । माताच मानोनी गुरुपत्नीस ॥ ४५ ॥सकल शिष्य गेले ओंकारेश्वरासी । दहावे दिवसासी पिंडदाना ॥ ४६ ॥यथासांग कर्म करोनियां तेथ । पिंड तो ठेवीत स्मशानांत ॥ ४७ ॥पिंडस्पर्श केला काकें तये वेळीं । दिधलें तिलांजलिला सकळिकांनीं ॥ ४८ ॥बाबा तिलांजली देवोनि परतले । परतोनि आले मठामार्जी ॥ ४९ ॥सकळ शिष्यजन आले ते मठांत । पात्रें भोजनाप्रत सिद्ध केलीं ॥ ५० ॥बीडकर महाराज सकळांसि सांगती । बसा भोजनाप्रती त्वरित आतां ॥ ५१ ॥सकळही मंडळी बसली पात्रावरी । परी रीत न्यारी बाबांची ती ॥ ५२ ॥बाबा एके बाजू जाऊनि बैसले । बोलायाचे झाले बंद तेव्हां ॥ ५३ ॥शिष्य तेव्हां बीडकरां जावोनि सांगती । रावसाहेब न उठती भोजनासी ॥ ५४ ॥महाराज आले जेथें होते बाबा । वदती चल तूं बा भोजनासी ॥ ५५ ॥बाबा तेव्हां वदती महाराजांप्रत । दाखवा मजप्रत आई आतां ॥ ५६ ॥दाखवावें मज आईसाहेबांसी । सगुणस्वरूपार्सी धरोनियां ॥ ५७ ॥सगुण दर्शन घेतल्या वीण । मी ना तें करीन भोजन कीं ॥ ५८ ॥हट्ट धरोनियां मारिली बैठक । उठती न देख कांहीं केल्या ॥ ५९ ॥बीडकर महाराजांनीं धरिले उग्र रूप । दिल्या शिव्या खूप बाबांलागीं ॥ ६० ॥मेलेलीं माणसें जिवंत का होती । कळेना तुजप्रती कैसे मूढा ॥ ६१ ॥अतीव संतप्त होवोनी बोलती । अर्वाच्य वदती शब्द ते कीं ॥ ६२ ॥जमदग्नीचा तो आणोनिया आव । दाविताती भाव कोपल्याचा ॥ ६३ ॥तरीही न बाबा हलती तिळभरी । बोलती वैखरी, आई दावा ॥ ६४ ॥आईचे दर्शन द्याहो लेकुरासी । नातरी उपवासी राहीन मी ॥ ६५ ॥कंटाळले सारे थकले बीडकर । म्हणती भराभर जेवा तुम्हीं ॥ ६६ ॥रावसाहेब वेडा हट्टी असे फार । न करा विचार त्याचा कांहीं ॥ ६७ ॥समस्त ते लोक भोजन सारोनी । घेताती जावोनी विश्रांतीसी ॥ ६८ ॥खालीं घालोनियां मान ते बैसले । बाबा रुसलेले जैसे तैसे ॥ ६९ ॥मग रामानंदीं काय केली गोठी । निरोपिलें शेवटीं शिष्यालागीं ॥ ७० ॥पाकशाळेमाजी मांडा पानें तीन । सर्वही वाढोन सिद्ध करा ॥ ७१ ॥वाढोनियां सारे, व्हा तुम्हीं बाजूस । जेववीन त्यांस मीच आतां ॥ ७२ ॥धरोनियां हात हळूच बाबांचा । वदती ते वाचा चल आतां ॥ ७३ ॥तुज दाखवितों आई पाटावरी । करितां भोजन खरी तुजसंगें ॥ ७४ ॥ऐकोनियां मात बाबा हरुषले । निमूटचि गेले भोजनासी ॥ ७५ ॥सद्गुरुवचनीं धरोनी विश्वास । भोजनगृहास जाते झाले ॥ ७६ ॥बीडकर आणि बाबा आंत गेले । बंद त्यांनी केलें द्वार मग ॥ ७७ ॥बसले बीडकर एका पाटावर । दुजिया पाटावर बसले बाबा ॥ ७८ ॥परी न थांबती नयनीं अश्रुधारा । म्हणती शब्द करा खरा आतां ॥ ७९ ॥घालुनी लोटांगण धरिले चरण । म्हणती न सोडिन दिसल्यावीण ॥ ८० ॥बघुनी दृढभाव सद्गुरु माउली । बहुत तोषली अंतरांत ॥ ८१ ॥म्हणती 'रावसाहेब, माझा मोती दाणा । प्रसन्न त्याचे मना करितों आतां' ॥ ८२ ॥बैसविलें पाटीं थोपटोनि हातीं । देवोनियां दृष्टी दिव्य ती गा ॥ ८३ ॥आवाहन केलें मृत जानकीस । धरविलें रूपास स्वशक्तीनें ॥ ८४ ॥सगुण साकार नटोन थटोन । आई त्या येवोन बसल्या पाटीं ॥ ८५ ॥धांवोनिया मिठी घातली चरणीं । मग ती बाबांनीं क्षणमाजीं ॥ ८६ ॥अश्रूंनीं धुतले चरण मातेचे । आणि दर्शनाचें सुख घेती ॥ ८७ ॥बैसविला पाटीं धरोनियां हस्त । जेव रे त्वरित वदती बाळा ॥ ८८ ॥एके पाटीं बसले तेव्हां बीडकर । दुसरे पाटावर जानकी माता ॥ ८९ ॥मधलिये पाटीं बाबा स्थित झाले । त्रिवर्गी सारिलें* भोजनासी ॥ ९० ॥आई वदती तेव्हां शोक न करीं बाळा । मायेचा हा गोळा पंचतत्त्वीं ॥ ९१ ॥देवादिकांलागीं सोडावाचि लागे । कवतिक काय सांगें मानवाचें ॥ ९२ ॥नामरूपात्मक शरीराची आस । सोडोनिंया ध्यास स्वरूपीं धरणें ॥ ९३ ॥अनादि अनंत दिक्कालातीत । आत्मा विलसत स्वयंप्रभ ॥ ९४ ॥तुझिये अंतरीं वसे निरंतर । ध्यानीं नित्य धर त्यासी बाळा ॥ ९५ ॥नको करूं हट्ट नको मानूं क्लेश । सगुणाची आस सोडीं सोडीं ॥ ९६ ॥तुज सद्गुरुनाथें केला परिपूर्ण । त्यजीं आवरण मायेचें हें ॥ ९७ ॥नामरूपें नासती आत्मा तो अमर । पूर्ण परात्पर सद्गुरुनाथ ॥ ९८ ॥तोचि तो सद्गुरु स्वयं आत्माराम । स्वरूपीं रमणें धर्म खरा हाची ॥ ९९ ॥ऐसें हें ऐकोन करिती नमस्कार । बाबा ते सत्वर माताजींसी ॥ १०० ॥ऐकोनियां सारें अंतरीं तोषले । पुशिती त्यांचे डोळे रामानंद ॥ १०१ ॥दिधली आज्ञा त्यांनीं आईसी जावया । निघुनी अपुले ठाया मग तेव्हां ॥ १०२ ॥आज्ञा ती कीं होतां गुप्त झाली माता । आशीर्वाद पुत्रा देवोनियां ॥ १०३ ॥मग सद्गुरु बाबा बीडकर-चरणांसी । वंदिती त्वरेंसी साष्टांगची ॥ १०४ ॥उमजलों आतां उमजलों आतां । हट्ट मी पुरता सोडियेला ॥ १०५ ॥आईचे ते शब्द धरिले अंतरीं । वर्तन उत्तरीं आज्ञे ऐसा ॥ १०६ ॥गेला अहंकार विनटले चरणीं । पडोनियां धरणीं सद्गुरुंच्या ॥ १०७ ॥तैं रामानंद बहुत प्रेमभरें । उठविती त्वरें बाबांसी ते ॥ १०८ ॥कवळोनि धरिला शिष्य हृदयासी । बहू प्रेमें त्यासी बोलताती ॥ १०९ ॥बंडू आतां तुज नको दुजा भाव । दिधला माझा ठाव सर्वहि तुजला ॥ ११० ॥अहंकार तुझा घेतला मीं सारा । करुनी चमत्कारा तोषविलें ॥ १११ ॥मग गुरुशिष्य आले ते बाहेर । उघडोनि द्वार सहजपणें ॥ ११२ ॥दोघे जण आंत परी पानें तीन । जेवलीं तीं पूर्ण तये काळीं ॥ ११३ ॥चतुर्दश दिवसांचे सारें क्रियाकर्म । संपवोनि धर्म करिती मोठा ॥ ११४ ॥दास म्हणे संक्षिप्त सद्गुरुचरित्रीं । पूर्ती झाली बरी अष्टमाध्याया ॥ ११५ ॥येथून ऐका